संजय राऊतांना जामीन मंजूर; दीपक केसरकरांनी दिल्या सदिच्छा, म्हणाले…

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. तेव्हापासून ते सीबीआय कोठडीत होते. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक वेळी पीएमएलए न्यायालयाकडून राऊतांचा अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.



संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाल्याच्या निर्णयाचं केसरकरांनी स्वागत केलं आहे. संजय राऊत यांच्यावर आमचा कुठलाही वैयक्तिक राग नाही. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्याकडून चांगलं काम घडो, अशा सदिच्छा केसरकरांनी दिल्या आहेत. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले की, संजय राऊत चुकीचं बोलले असतील तर त्याला त्यापद्धतीने उत्तरं दिली जातात. ते चांगलं बोलले तर, त्याचं समर्थनही केलं जातं. ज्यावेळी हे पथ्य पाळलं जातं, त्यावेळी व्यक्तिगत संबंधांमध्ये कुठेही दुरावा निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांनी टीका केली तर त्यांच्या टीकेचं स्वागतच आहे. टीकेमुळे आपल्याला उत्तर देता येतात, आपला कारभार सुधारतो. पण टीका करत असताना योग्य त्या भाषेत टीका करावी, अशी अपेक्षा असते, असंही केसरकर म्हणाले.

संजय राऊतांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले की, “ही घडून गेलेली बाब आहे. त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांची तुरुंगातून सुटका झाली असेल तर चांगली बाब आहे. आमचा त्यांच्यावर कुठलाही वैयक्तिक राग नाही. ते जेव्हा-जेव्हा आमच्याविरुद्ध बोलले होते, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना उत्तरं दिली आहेत. त्यामुळे तो आपापल्या तत्त्वांचा भाग आहे. आता त्यांनी चांगल्या भाषेत टीका करावी, एवढीच साधारण अपेक्षा आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्याकडून चांगलं काम घडो, अशीच सदिच्छा मी त्यांना देतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने