मुलायम सिंहांच्या जागेवरून लढणार सुनबाई; पक्षाकडून डिंपल यादवांचं नाव जाहीर

उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षानं अखिलेश यादव  यांच्या पत्नी डिंपल यादवयांना लोकसभा मतदारसंघ मैनपुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलंय. सपा संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांची सून डिंपल आता रिक्त झालेल्या मैनपुरी मतदारसंघाचा  वारसा सांभाळणार आहे.

आज (गुरुवार) समाजवादी पक्षानं  याची अधिकृत घोषणा केली. ही निवडणूक 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. मुलायमसिंह यादव  यांचं गेल्या महिन्यात दीर्घ आजारानं निधन झालं. मैनपुरी लोकसभा जागेसोबतच पाच राज्यांतील पाच विधानसभा जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशच्या रामपूर सदर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे.



सपा नेते मोहम्मद आझम खान यांना अपात्र ठरवल्यानंतर रामपूर विधानसभा जागा रिक्त झाली होती. खान, जे रामपूरचे आमदार होते, त्यांना एप्रिल 2019 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात आलं. काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांच्या निधनानंतर राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय ओडिशातील पदमपूर, बिहारमधील कुधनी आणि छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर या इतर विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने