नोकरीबाबत महत्वाची माहिती समोर; Elon Musk ट्विटरच्या 50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!

अमेरिका : ट्विटर आणि मस्कचा व्यवहार पूर्ण होणार की नाही याबाबत प्रचंड गोंधळ आणि शंका होत्या. आता हा करार पूर्ण होत ट्विटरचा ताबा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्याकडं आला आहे. इलॉन मस्क यांनी आता पूर्णपणे ट्विटरची मालकी घेतलीय. त्यानंतर लगेचच इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेशही दिल्याचं वृत्त आहे.



या प्रक्रियेदरम्यान कंपनीतून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास त्यांनी व्यवस्थापनाला सांगितलंय. यासोबतच मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या धोरणांमध्ये बदल करण्यास सांगण्यात आलंय. मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांना काढून टाकलं आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, मस्क ट्विटरवरून 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. याबाबत त्यांचं नियोजन सुरुय.ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं हा दावा केलाय. US $ 44 अब्जमध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर, मस्क यांनी कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी कंपनीच्या अर्ध्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच, 3,700 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची योजना आखलीय. या कंपनीत 7 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

ट्विटरचे नवे बॉस इलॉन मस्क शुक्रवारपर्यंत पीडित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलंय. मस्क यांनी कंपनीचं सध्याचं धोरण बदलण्याचा निर्णय घेतलाय. मस्क आणि त्यांच्या सल्लागारांची टीम सॅन फ्रान्सिस्कोमधील ट्विटरच्या कार्यालयात नोकरीतील कपात आणि इतर धोरणात्मक बदलांवर चर्चा करत आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर त्यांना 60 दिवसांचा पगार देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ट्विटरच्या प्रवक्त्यानं या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.ट्विटरच्या अधिग्रहणानंतर, इलॉन मस्क यांनी त्यांचं प्राधान्यक्रम स्पष्ट केलं आहे. ते मुख्य उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असून यामध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, सर्व्हर ऑपरेशन आणि डिझाइन रोस्टचा समावेश आहे. उत्पादन संघातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हेडकाउंट 50 टक्के कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यास सांगितलं होतं. टेस्ला अभियंते आणि संचालक-स्तरीय कर्मचार्‍यांनी या यादीचं पुनरावलोकन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने