“मला तरी कुठे माहिती होतं की मी CM होणार, हा तर…”; शिंदे ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचा उल्लेख करत म्हणाले, “स्वत:ची संपत्ती…”

मुंबई : २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. २०२४ ला तुम्हीच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असाल का यासंदर्भात शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये अगदी सत्तांतरणापासून ते महाराष्ट्रातील प्रकल्पांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी आपली मतं मांडली त्याचप्रमाणे धोरणांबद्दल सविस्तर माहिती दिली. मात्र एका प्रश्नाला उत्तर देताना आपल्यालाच आपण मुख्यमंत्री होणार याची कल्पना नव्हती असं शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातून बोलताना महाशक्ती आमच्या पाठीशी असल्यास काही अडचण आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी मुलाखतकाराला विचारला.



२०२४ ला शिंदे निवडणुकीचा चेहरा?
“२०२४ ला तुम्ही सरकारचा चेहरा म्हणून तुम्हीच मुख्य चेहरा म्हणून निवडणुकीला समोरे जाणार का? २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक आणि त्याआधी लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला तुम्ही सोबत राहावं अशी अपेक्षा आहे, असं विरोधक सांगतात,” असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी आपण साधे कार्यकर्ते आहोत असं म्हटलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा देशातील लोकांनी, जगभरातील लोकांनी पाहिला आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचा चेहरा वापरुन त्यांना निवडणुकीला सामोरं जाण्याची काय गरज आहे? ते तर स्वत: फार लोकप्रिय आहेत,” असं शिंदे म्हणाले.

“मला जी आज संधी मिळाली आहे तिचा वापर मी…”
“विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नावाने आणि चेहऱ्याच्या आधारे लढल्या जातात,” असं म्हणत पत्रकाराने शिंदेंना प्रतिप्रश्न केला. त्यावर शिंदेंनी, “मला जी आज संधी मिळाली आहे तिचा वापर मी लोकांच्या फायद्यासाठी आणि विकासासाठी करणार आहे. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विषयांवर आम्ही काम करणार आहोत,” असं शिंदे म्हणाले. शिंदे विकास कामांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत बोलू लागले. त्यानंतर मुलाखतकाराने पुन्हा आपल्या मुळ प्रश्नाला उल्लेख करत २०२४ मध्ये तुम्हीच निवडणुकीचा चेहरा असाल का? असा प्रश्न विचारला..

“मी मुख्यमंत्री होणार याची कल्पना नव्हती, हा तर…”

या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी, “२०२४ पर्यंत आम्ही कामच लोकांच्या भल्यासाठी करणार आहोत. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो,” असं म्हटलं. आपण कार्यकर्त्याप्रमाणे असल्याचं सांगताना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्यलाच मुख्यमंत्रीपद मिळेल याची कल्पना नव्हती असं म्हटलं. “मला तरी कुठे माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे. हा तर त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला मुख्यमंत्री केलं. हे सर्व जनता ठरवते,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाशक्तीसंदर्भातही केलं विधान…
“महाशक्तीचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी असणार का?” असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी, “महाशक्ती तर आहेच ना पाठीशी. सुरुवातीपासून आहे. काय अडचण आहे त्यात?” असा प्रतिप्रश्न मुलाखतकारालाच केला. “चांगलं काम करणाऱ्या झुंजार नेत्यांना ते संधी देतात. तशीच मला संधी दिली आहे. मला जी संधी दिली आहे त्याचा मी लोकांची कामं करण्यासाठी वापर करेन. स्वत:ची संपत्ती बनवण्यासाठी या संधीचा वापर करणार नाही. म्हणून लोकांना वाटतंय की हा तर आपल्यातला एकजण मुख्यमंत्री झाला आहे,” असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

पुन्हा मुख्यमंत्री होणार का?
पुन्हा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर शिंदेंनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. “ते तर जनता ठरवेल, असं मी सांगून थोडी काही होणार आहे. हे जनतेच्या हाती असतं. आमच्या हाती केवळ चांगलं काम करणं आहे,” असं शिंदे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने