राहुल गांधींसोबत Bharat Jodo Yatra मध्ये चालायला २०,००० शुल्क?

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आहेत. या भारत जोडो यात्रेबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे यामागची सत्यता? जाणून घ्या...

काय आहे ही चर्चा?

या समर्थकांनी भारत तोडो यात्रा असा या यात्रेचा उल्लेख केला आहे. या यात्रेतही मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे, असा दावा भाजपा समर्थकांकडून केला जात आहे. या यात्रेत राहुल गांधीं सोबत चालण्यासाठी प्रत्येकांना विशेष पासेस देण्यात आले होते. एका विशेष पासची किंमत प्रति व्यक्ती/ प्रति पास/ 20,000/ - रुपये एवढी होती. 20 हजार रुपये द्यायचे आणि राहुल गांधी सोबत चालायचे, असा दावा समर्थकांच्या मार्फत केला जात आहे.



भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्यांचं काय म्हणणं आहे?

याबद्दल 'सकाळ'ने भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या काही जणांशी संवाद साधला. राहुल गांधींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत चालण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हा दावा त्यांनी फेटाळला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या 'साम टीव्ही'च्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी याविषयी आपला अनुभव सांगितला आहे.पुराणिक म्हणाल्या, "राहुल गांधींसोबत चालण्यासाठी पैसे वगैरे घेतले जातात, या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही राहुल गांधींना हाक मारलीत आणि त्यांनी बोलावलं, तर तुम्ही त्यांच्यासोबत चालू शकता. शिवाय, तुम्ही जर त्यांच्यासोबत असलेल्या स्थानिक नेत्यांना हाक मारली, किंवा त्यांना सांगितलं, तरी त्यांच्या मार्फत तुम्ही राहुल गांधींसोबत चालू शकता. महिला काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुरक्षारक्षकांना सांगितलं, तेव्हा मीही महिला पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत चालले. त्यांच्यासोबत चालण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलं नाही."

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना त्याच्या समन्वयक समितीच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अड. वर्षा देशपांडे यांनीही याविषयी खुलासा करत भाजपा समर्थकांचा हा दावा खोडून काढला आहे. अॅड. देशपांडे सकाळशी बोलताना म्हणाल्या,"भारत जोडो यात्रेदरम्यान जर तुम्हाला राहुल गांधींसोबत एखादा मुद्दा घेऊन नियोजित चर्चा करायची असेल, तर त्यासाठी त्यांना झेड सुरक्षा असल्या कारणाने तुमची काही वैयक्तिक माहिती आधी देऊन नोंदणी करावी लागेल. सुरक्षेच्या कारणास्तव आधार कार्ड, ब्लड गृप, मेल आयडी, फोन नंबर, नाव, तसंच कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे तो मुद्दा सांगावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी वन टू वन चर्चा करता येऊ शकते. मात्र यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही."अड. देशपांडे पुढे म्हणाल्या, "हे झालं यात्रेत चालताना बोलण्यासाठी. मात्र जर तुम्हाला राहुल गांधींशी बसून चर्चा करायची असेल, तर त्यासाठीही तुम्हाला निर्धारित वेळ दिली जाईल. त्यासाठीही अशाच प्रकारची माहिती देणं सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक आहे. मात्र कोणत्याही भेटीसाठी कोणाकडूनही कसल्याच प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रवासखर्चही दिला जात नाही. सहभागी होणाऱ्यांना स्वखर्चाने यावे लागते. ज्यांनी पास घेतले आहेत, त्यांच्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही आहे. मात्र ही व्यवस्थाही निःशुल्क आहे. "

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने