लाखोचा पगार, तरी मागतात लाच! ३४ महिन्यांत ‘लाचलुचपत’च्या २ हजार कारवाया

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून आता आठ महिने झाले. सध्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्या संस्थांवरील पदाधिकाऱ्यांचा नेहमीच वचक असतो. पण, आठ महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकारीच नसल्याने लाखोरी वाढल्याची चर्चा आहे. मार्च ते ३१ ऑक्टोबर या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ५१९ कारवाया केल्या असून पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, शिक्षण, कृषी, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वल आहेत.


‘भ्रष्टाचारमुक्त भारता’ची अनेकदा घोषणा झाली, पण त्याचा लाचखोरांना काहीच फरक पडल्याची सद्यस्थिती नाही. लोकहिताची कामे तथा बहुतेक योजनांची अंमलबजावणी आता ऑनलाइन पध्दतीनेच होत आहे. तरीपण, काही ना काही कारणावरून लाभार्थींना सरकारी कार्यालयाचा उंबरठा ठोठावाच लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ज्या विभागांमध्ये जनसंपर्क सर्वाधिक, तेथेच लाच मागणे किंवा घेण्याचे प्रकार सर्वाधिक आहेत. विशेष बाब म्हणजे लाखो रुपयांचा दरमहा पगार मिळत असतानाही सर्वसामान्यांची अडवणूक करून अधिकारी, कर्मचारी हजारांची लाच मागितात. जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२२ या काळात (३४ महिने) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात दोन हजार सहा कारवाया केल्या आहेत. त्यात महसूल विभागात ४७८ तर पोलिस विभागात ४६३ कारवाया झाल्या आहेत. दरम्यान, मागील आठ महिन्यांत ‘लाचलुचपत’च्या दरमहा सरासरी ७० कारवाया झाल्या आहेत. लाचखोरीत पुणे, नाशिक, औरंगाबाद विभाग अव्वल असल्याचे कारवायातून स्पष्ट झाले आहे.

लाखोंची पगार, तरीपण मागतात लाच

सहावा, सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता हे सर्व मिळून सरकारी अधिकाऱ्यांना दरमहा एक लाखांहून अधिक वेतन आहे. तरीपण, वरिष्ठ अधिकारीच बहुतेकवेळा लाच प्रकरणात रंगेहाथ पकडले जात आहेत. लाच घेणारे अधिकारी, कर्मचारी पोटाला चिमटा घेऊन नोकरीसाठी एवढा मोठा संघर्ष करतात. मुलाखतीवेळी मोठमोठ्या बाता मारतात आणि प्रशासनात दाखल झाल्यावर अनेकजण लाचखोर निघतात. ‘डिजिटल इंडिया’त अजूनही सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, हे विशेष. त्यामुळे जाणूनबूजून काम अडवून असे प्रकार केले जात आहेत.

वर्षनिहाय लाचेच्या कारवाया

  • २०२०

  • एकूण कारवाया

  • ६३०

  • लाचेची एकूण रक्कम

  • १.५३ कोटी

  • ----

  • २०२१

  • एकूण कारवाया

  • ७६४

  • लाचेची एकूण रक्कम

  • २.५७ कोटी

  • ----

  • २०२२ ऑक्टोबरपर्यंत

  • एकूण कारवाया

  • ६१२

  • लाचेची एकूण रक्कम

  • २.६४ कोटी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने