ग्रामपंचायत निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना लढवणार; राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या जिल्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना लढवणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, ‘ग्रामपंचायती निवडणुका लढविण्याचा सर्वांना अनुभव आहे. पक्षात ज्येष्ठ आणि युवा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा नवनियुक्त पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावा.’



क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना राज्यात आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे असल्याने विकासकामे आणि राज्य शासनाचे जनहिताचे निर्णय या जोरावर मतदारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार होणार आहे. तत्पूर्वी, नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने गावपातळीवर चाचपणी करून त्याचा अहवाल दोन - तीन दिवसांत सादर करावा. सर्वसमावेशक जबाबदाऱ्या वाटून घेऊन आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने