कोरोनाचे प्रतिबंध iPhone साठी संकट

बीजिंग : जगातील सर्वांत मोठा आयफोन उत्पादक प्रकल्प असलेल्या चीनमधील झेंगझाऊ शहरातील ‘फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप’या कंपनीच्या परिसरात सात दिवसांचा लॉकडाउन चीन सरकारने जाहीर केला आहे. यामुळे येथून होणाऱ्या आयफोनच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



स्थानिक सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार हा लॉकडाउन नऊ नोव्हेंबरपर्यंत असेल. लॉकडाउन जाहीर केलेल्या परिसरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. झेंगझाऊमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला.या लॉकडाउनमुळे फॉक्सकॉनच्या मुख्य प्रकल्पाचे काम ठप्प पडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या तैवानच्या कंपनी कंपनीत काम करणाऱ्या अंदाजे दोन लाख कर्मचाऱ्यांपैकी काहींना विलगीकरणात ठेवावे लागले आहे.लॉकडाउनमधून बचाव करण्यासाठी काहींनी पलायन केले आहे. कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले आहे. कंपनीतील कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नवीन कर्मचारी भरती करून त्यांना प्रकल्पस्थळी आणण्यात आणि उत्पादन साहित्याची वाहतूक करण्यात लॉकडाउनमुळे अडथळे येणार आहेत.

‘ॲपल’साठी निर्णायक काळ

इलेक्ट्रॉनिक्सच्या मागणीत अभूतपूर्व मंदी असताना आयफोन १४ बाजारात आणण्याचे धाडस दाखवणाऱ्या ‘ॲपल’कंपनीसाठी लॉकडाउनचा कालावधी निर्णायक ठरणार आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे. फॉक्सकॉनच्या झेंगझाऊतील प्रकल्पात ‘आयफोन १४’चे ८० टक्के तर ‘आयफोन १४ प्रो’चे ८५ टक्के उत्पादन होत आहे.

भारतासाठी संधी

कोरोनामुळे चीनमध्ये वारंवार प्रतिबंध लागू केले जात आहे. यामुळे कामकाजात खंड पडत असल्याने तेथील ‘ॲपल’सह अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पर्याय शोधत आहेत. अशा वेळी भारताला मोठी संधी आहे. आयफोनच्या कंत्राटदार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप, विस्‍ट्रॉन कॉर्प आणि पेगास्ट्रॉन कॉर्प या कंपन्या दक्षिण भारतात आयफोनची निर्मिती करतात. आयफोनच्या एकूण उत्पादनात भारतातील हिस्सा कमी असली तरी त्यात वाढ होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने