व्हॉट्सअ‍ॅप वापरताना 'या' चूका टाळा, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

मुंबई:  इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. केवळ मेसेजच नाही तर वॉइस, व्हीडिओ कॉलपासून ते फोटो-व्हीडिओ शेअर करण्याची सुविधा देखील व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहे.व्हॉट्सअ‍ॅपवर आपण अनेकांशी संवाद साधत असतो. याशिवाय, अनेक ग्रुप्सशी देखील जोडलेले असतो. परंतु, या अ‍ॅपचा वापर करताना काळजी न घेतल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.व्हॉट्सअ‍ॅप वापरताना केलेली एक छोटी चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे अ‍ॅपचा वापर करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, याविषयी जाणून घेऊया.



फेक न्यूज शेअर करणे टाळा

आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून अनेकांना मेसेज फॉरवर्ड करत असतो. मात्र, कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे फेक न्यूज पसरवण्याचे मोठे माध्यम बनत चालले आहे. कंपनीने याबाबत कठोर नियम केले आहेत. याशिवाय, सरकार देखील फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

हिंसेला प्रोत्साहन देणारे मेसेज शेअर करू नका

एखाद्या विशिष्ट धर्म, जात अथवा समुदायाविषयी द्वेष पसरवणारे मेसेज शेअर करणे महागात पडू शकते. समाजाची शांतता बिघडवण्याच्या अथवा हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शेअर केलेल्या मेसेजमुळे तुम्हाला जेल देखील होऊ शकते. त्यामुळे चुकूनही असे मेसेज फॉरवर्ड करू नये.

पोर्न फाइल शेअर करू नका

व्हॉट्सअ‍ॅपवर पोर्न शेअर केल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता. खासकरून, चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे आक्षेपार्ह्य फोटो अथवा व्हिडिओ या अ‍ॅपच्या माध्यमातून अजिबात शेअर करू नका. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करणे, बनावट अकाउंट बनवणे आणि अ‍ॅपवरून एखाद्या व्यक्तीला धमकवण्याचा प्रयत्न केल्यावरही जेल होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने