संवाद कायम ठेऊ या; बायडेन यांचे आश्‍वासन

इंडोनेशिया: तैवान मुद्यावरून वाढलेला तणाव आणि इतर अनेक प्रकरणांवरून सुरु असलेला वाद या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची आज इंडोनेशियात प्रत्यक्ष भेट झाली. बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांची जिनपिंग यांच्याबरोबर झालेली ही पहिलीच भेट आहे. संवाद कायम ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे बायडेन यांनी यावेळी जिनपिंग यांना सांगितले.



जी-२० परिषदेसाठी ज्यो बायडेन, जिनपिंग यांच्यासह इतर सदस्य देशांचे प्रमुख इंडोनेशियाची राजधानी बाली येथे येत आहेत. गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. तैवानमध्ये अमेरिकेच्या मंत्र्यांचे दौरे सुरु झाल्यानंतर या तणावात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाली येथे परिषदेच्या ठिकाणी बायडेन आणि जिनपिंग समोरासमोर आले.यावेळी दोघांनी हसून, हस्तांदोलन करत एकमेकांचे स्वागत केले. ही या दोन नेत्यांमधील पहिलीच भेट असली तरी त्यांच्या दूरध्वनीवरून अनेकवेळेस संवाद झाला आहे. बायडेन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असतानाही त्यांची जिनपिंग यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती.

वैयक्तिकरित्या आपल्या दोघांमध्ये संवाद कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र, आपापल्या देशांना विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यास बराच वाव आहे, असे बायडेन यावेळी जिनपिंग यांना म्हणाले. आपल्या देशांचे प्रतिनिधी या नात्याने वाद मिटविण्याची आणि संघर्ष टाळण्याची जबाबदारी आपल्या दोघांवर आहे. जागतिक समस्येच्या मुद्यांवरही आपण सहकार्याने काम करू, असेही बायडेन म्हणाले.जिनपिंग यांनीही, अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव जनतेच्या हिताचा नसल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय समुदायाचीही आपल्याकडून ही अपेक्षा नसल्याचे सांगितले. बायडेन यांच्याबरोबर विविध मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्याचीही आपली तयारी असल्याचे जिनपिंग यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने