सुप्रिया सुळेंवरील आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादीचे थेट राज्यपालांना निवेदन, अब्दुल सत्तारांना बडतर्फ करण्याची मागणी

मुंबई - अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. राज्यपालांना निवदेन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.



काय म्हणाले जयंत पाटील?

“सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्दांचा वापर करून अब्दुल सत्तार यांनी खालचा स्तर जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध आज संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवदेन आम्ही राज्यपालांना दिले आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.“ही पहिली घटना नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनेकवेळा त्यांनी अशा प्रकारे विधानं केली आहेत. मंत्रीमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे केली आहे”, असेही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे. राज्यात असा प्रकारे भाषा वापरण्याची पद्धत नाही. राज्याची एक राजकीय संस्कृती आहे. आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली आहे. आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने