कशी आहे 'गोष्ट एका पैठणीची'? जाणून घ्या सर्वकाही..

मुंबई: गेली काही दिवस सतत चर्चेत असणारा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. करोनामुळे लांबलेला हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जाणून घेऊया हा चित्रपत्र नेमका काय आहे? त्यातील कलाकार, आशय-विषय आणि बरंच काही..'६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२'चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला 'गोष्ट एका पैठणीची'चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीच्या सामान्य स्वप्नाचा प्रवास असणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर सिंगापूर येथे झाला. आता लवकरच म्हणजे २ डिसेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



पोस्टरमध्ये सायली संजीव, सुव्रत जोशी आणि आरव शेट्ये दिसत असून त्यांचं हसतंखेळतं कुटुंब दिसत आहे. छोट्या गावातील या गृहिणीचा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास तिला कुठंवर घेऊन जातो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, " प्रत्येक जण उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वोतोपरी धडपड सुरु असते. यात कधी यश येते, कधी अपयश येते. आयुष्यात एखादी पैठणी घ्यावी, इतकं सामान्य स्वप्न पाहणाऱ्या गृहिणीचा असामान्य प्रवास यात पाहायला मिळणार आहे. हा कौटुंबिक सिनेमा नकळत बऱ्याच गोष्टी शिकवणारा आहे.''

या सिनेमाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने