'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार 'यशवंतराव चव्हाण'

मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे दर काही दिवसांनी या चित्रपटाविषयी लिहीत असतात, आठवणी शेयर करत असतात. एप्रिल 2023,मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटा संदर्भात आता अनेक नवीन घोषणा होत आहे. आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन, त्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका कोण साकारणार ही उघड झाले आहे. नुकताच एक पोस्टर केदार शिंदे यांनी शेयर केला आहे.



शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत. लवकरच ते शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट घेऊन येत आहेत. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेविषयी आज केदार शिंदे यांनी पोस्ट केली आहे. 

नुकतच या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण  यांच्या भूमिकेत अतुल काळेदिसणार आहेत. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे की, 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.. 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण.. हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव ह्यांचं नातं राजकारणाच्या ही पलीकडचं होतं.. हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात..'अतुल काळे हे मराठीतील दिग्गज अभिनेते आहेत. 'वास्तव','जिस देश मै गंगा रहता है','दे धक्का' अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. तसेच अतुल काळे यांनी 'बाळकडू' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ते 'यशवंतराव चव्हाण' यांची भूमिका साकारणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने