‘ॲपल’च्या कर्मचाऱ्यांवर लाठीमार

बीजिंग : ‘ॲपल’ कंपनीच्या जगातील सर्वांत मोठ्या ‘आयफोन’ उत्पादन केंद्रात कर्मचाऱ्यांनी कंत्राटावरून आणि संसर्ग नियमांवरून आंदोलन सुरु केले आहे. चीनमधील झेंगझोऊ या शहरात हा कारखाना असून हजारो कर्मचाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असतानाचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्मचाऱ्यांवर पोलिस लाठीमार करत असल्याचे आणि त्यांना ताब्यात घेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. कंपनीने कंत्राटाचा भंग केल्यावरून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. संसर्ग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांचा बाहेरील व्यक्तीशी संपर्क येऊन संसर्ग होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. मात्र, तसे करारात नमूद नसल्याने आणि राहण्याच्या ठिकाणी संसर्गाविरोधात पुरेसे संरक्षण नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.



कठोर नियमांमुळे गेल्या महिन्यात अनेकांनी नोकरी सोडली होती. नव्याने भरती केलेल्यांनाही कराराची पूर्ण माहिती न दिल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. आपल्याला संशयित कोरोना रुग्णाबरोबरच राहावे लागत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज हजारो कर्मचाऱ्यांनी निदर्शने सुरु केल्यानंतर कारखान्याचे संचालन करणाऱ्या ‘फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप’ने पोलिसांना पाचारण केले. यावेळी कर्मचारी आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. आंदोलकांना पोलिस लाठीमार करत असल्याचेआणि आंदोलकही पोलिसांवर हल्ले करत असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. झेंगझोऊ शहर प्रशासनाने औद्योगिक भागात कठोर संसर्ग नियम लागू केल्याचा फटका आयफोन-१४ च्या उत्पादनाला बसला आहे. यामुळे ‘आयफोन १४’ बाजारात आणण्यास विलंब होण्याचा इशारा ‘ॲपल’ कंपनीने आधीच दिला आहे.

स्थानिकांच्या भरतीचे आदेश

झेंगझोऊ कारखान्यात लागू केलेल्या कठोर नियमांमुळे गेल्या महिन्यात अनेक कर्मचारी नोकरी सोडून निघून गेले होते. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेला फटका बसला आहे. त्यामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी स्थानिक लोकांना तातडीने भरती करून काम सुरु ठेवण्याचे आदेश कारखान्याच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्यांनीही नाराजी व्यक्त करत नोकऱ्या सोडण्यास सुरुवात केली आहे. अद्यापही लाऊकडाऊन लागू करणारा चीन हा जगातील बड्या देशांपैकी एकमेव आहे. कडक नियमावलीमुळे देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने होत असल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने