दिशाभूल केल्याने गोळ्या झाडल्या

पाकिस्तान: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा कबुलीजबाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला असून यात तो इम्रान खान हे देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे आपण हत्येचा कट रचला, असे तो म्हणताना दिसतो. दरम्यान, व्हिडिओ ‘लीक’ झाल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. इम्रान खान (वय ७०) यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या पायावर सुमारे दीड तास शस्त्रक्रिया झाली. यात काडतुसाचे तुकडे काढण्यात आले.



कालच्या हल्ल्यात इम्रान खान यांच्या एका पायाला गोळी चाटून गेली तर दुसऱ्या उजव्या पायाला गोळी लागल्याने हाड मोडले आहे. या गोळीबारात त्यांच्या पायावर १६ जखमा झाल्या. देशभरात या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे. काल रात्री पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) च्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला.काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि घोषणाबाजी देखील झाली. समर्थकांनी शुक्रवारी पाकिस्तान बंदचे आवाहन केले होते. गुजरानवाला येथे काल लॉंग मार्चदरम्यान झालेल्या गोळीबारात माजी पंतप्रधान इम्रान खान, खासदार फैजल जावेदसह १३ जण जखमी झाले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या.या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी आपल्याला ईश्‍वराने नवीन आयुष्य दिले आहे. मी परत येईन आणि लढाई सुरूच ठेवू, असे समर्थकांना सांगितले. इम्रान खान यांना किती गोळ्या लागल्या हे अधिकृतरीत्या सांगितलेले नाही, मात्र तीन ते चार गोळ्या लागल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांस पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव पोलिसांनी सांगितलेले नाही. इम्रान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पिस्तूल विकणाऱ्या दोघांना पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कबुली जबाबाचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानातील पत्रकारांनी हल्लेखोराचा चौकशीदरम्यान दिलेला जबाबाचा व्हिडिओ शेअर केला. त्यात तो म्हणतो, की मी एकटाच हल्ला करण्यासाठी आलो होतो. आपण इम्रान यांना मारू इच्छित होतो. इम्रान खान यांनी लाहोर सोडल्यानंतर त्यांच्या हत्येची योजना आखली होती. आपण केवळ इम्रान यांना मारू इच्छित असे हल्लेखोराने जबाबात म्हटले आहे.

मुख्यमंत्री इलाहीं़कडून व्हिडिओची दखल

इम्रान खान यांच्या हल्लेखोराने दिलेला कबुली जबाब सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या व्हिडिओची दखल घेत पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनी कारवाई केली. इलाही यांनी पंजाबचे पोलिस महानिरीक्षकाविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.

हल्लेखोराचा व्हिडिओ व्हायरल

गुजरानवाला येथील गोळीबारानंतर झालेल्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात हल्लेखोर हा शस्त्र घेऊन गर्दीपासून वाचण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र एका व्यक्तीने त्याला पाठीमागून पकडले. तेथूनही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला तत्काळ पकडले.

मानवाधिकार आयोगाकडून निषेध

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने निषेध केला आहे. सर्व राजकीय पक्षांना शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा आणि राज्याकडून सुरक्षा मिळवण्याची अपेक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच अमेरिका, ब्रिटनने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

समर्थकाने रोखला अनर्थ

इम्रान खान काल हल्ल्यातून थोडक्यात बचावले. इम्रान यांच्या कंटेनरपासून दहा फूट अंतरावर असलेल्या इम्रान समर्थक इब्तिसाम यांनी अनर्थ टाळला. हल्लेखोराच्या हातातील बंदूक पाहून त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोराचा नेम चुकला. इम्रान यांची घटस्फोटित पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी इब्तिसाम यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने