“नारायण राणेंना आपुलकीचा सल्ला, अजित पवारांचा नाद करू नका; ते…”, राष्ट्रवादीचा खोचक टोला!

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून आलं. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण राणेंना खोचक सल्ला देण्यात आला आहे.



काय म्हणाले होते नारायण राणे?

शुक्रवारी झालेल्या या बैठकीनंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली होती. “कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही. हे त्यांचे अज्ञान आहे. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का?” असं नारायण राणे यावेळी म्हणाले.“अजित पवार यांनी थापा मारण्याचे काम मीडियासमोर केले असून ते आपण ऐकलं आहे. त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेऊ”, असंही राणे यावेळी म्हणाले.

“बाकीच्यांचं ठीक आहे, पण…”

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावतानाच सल्लाही दिला आहे. “अजित पवार थापा मारतात – नारायण राणे.. राणेसाहेब, एक आपुलकीचा सल्ला! बाकीच्यांचे ठीक आहे पण अजितदादांचा नाद करू नका”, असं ट्वीटमध्ये वरपे म्हणाले आहेत.“अजितदादा थापा मारतात की काय करतात ते एकदा देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, पडळकर वगैरेंना विचारून घ्या”, असा टोलाही वरपे यांनी लगावला आहे.या ट्वीटमध्ये रविकांत वरपेंनी नारायण राणेंना टॅग केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने