आता रोबोट शोधून काढणार शेतातील तण, इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांचं संशोधन

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी शेतातील तण शोधून ते नाश करणारा रोबोट विकसित केला आहे. सद्य:स्थितीत शेती व्यवसायावर अनेक संकटे येत आहेत.शेतीमध्ये मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मजुरांअभावी शेती पडिक पाडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या सर्व बाबींचा विचार करून डीकेटीई इलेक्ट्रॉनिक्स विभागामधील प्रतीक सावंत, आकाश वाडकर, ओंकार परीट व ऋषिकेश बावडेकर या विद्यार्थ्यांनी प्रा. एस. ए. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंचलित तण शोधणे आणि ते तण काढण्याचा रोबोट विकसित केला आहे.



हा रोबोट सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत तयार करण्यात आलेला आहे. तसेच मोबाईल किंवा रिमोटवरून हा रोबोट नियंत्रित केला जाऊ शकतो. या रोबोटमध्ये शेतातील छायाचित्रे गोळा करण्यासाठी कॅमेरा वापरला आहे. कृत्रिम बुद्धिमता आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरून चित्रांवर प्रक्रिया केली जाते आणि यामुळे पीक आणि तण वर्गीकरण केले जाते. तण ओळखल्यानंतर रोबोटकडून हाताने तण उपटून बाहेर काढले जाते. हा रोबोट रोबोटिक आर्म, रासबेरी पाई बोर्ड, बक कन्व्हर्टर आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरून विकसित केला आहे. रास्पबेरी पाई बोर्ड रोबोट यंत्रणा नियंत्रित करते, बक कन्व्हर्टर रोबोटला शक्ती प्रदान करते तर मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या सहाय्याने तण शोधले जाते. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार करून हा प्रकल्प विकसित केला आहे.संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी रोबोट तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्र. संचालिका प्रा. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने