सचिन तेंदुलकरने कोल्हापूरात तांबडा-पांढऱ्या रश्‍श्‍यावर मारला ताव

कोल्हापूर : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी रात्री अचानक कोल्हापूरला धावती भेट दिली. उद्योजक तेज घाटगे यांच्या फार्महाउसवर मुक्काम ठोकलेल्या सचिनने रात्री तांबड्या, पांढऱ्या रश्‍श्‍यावर ताव मारला. तत्पूर्वी, त्याने उसाच्या रसाचीही चव चाखली. त्याच्यासोबत त्याचा मुलगा अर्जुन होता. त्याने सोमवारी पहाटे नृसिंहवाडी येथे दत्तदर्शन घेतले. त्यानंतर तो गोव्याच्या दिशेने रवाना झाला.

तब्बल २९ वर्षांनी सचिन रविवारी कोल्हापुरात आला होता. श्री. घाटगे यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यातून त्यांनी आपण कोल्हापूरला येत असल्याचे कळवले; पण नेमकी येण्याची वेळ निश्‍चित नसल्याने श्री. घाटगे हेही त्याच्या प्रतीक्षेत होते. तो, रात्री दहाच्या सुमारास श्री. घाटगे यांच्या गडमुडशिंगी येथील चेतन मोटर्सच्या पिछाडीस असलेल्या फॉर्महाउसवर दाखल झाला. त्याने आल्या आल्या उसाच्या रसाची चव चाखली.



सचिनचा तांबडा-पांढरा रश्‍श्‍यावर ताव

श्री. घाटगे यांनी त्यांच्यासाठी तांबडा, पांढरा रस्सा आणि मटणाच्या जेवणाचा बेत आखला होता. सचिनसह त्याचा मुलगा अर्जुन याने त्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सचिनने तेज व त्यांचे चुलत बंधू गौरव घाटगे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आपली रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केल्याचे श्री. घाटगे यांनी त्यांना सांगताच त्यांनी हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला.

मुंबईत गर्दीत रहातो, इथे परत शहरात हॉटेलमध्ये गेल्यास लोकांची गर्दी होईल, त्यापेक्षा अशा शेतात रहाणे मला आवडेल, असे सांगत सचिनने अर्जुनसह फॉर्महाऊसमध्येच मुक्काम ठोकला. पहाटे चार वाजता उठून त्याने नृसिंहवाडी गाठली, तेथे दत्त दर्शन घेऊन बेळगावमार्गे तो गोव्याला रवाना झाला. आज सोशल मीडियावर तेज घाटगे यांनी छायाचित्रांसह त्याच्या दौऱ्याची माहिती टाकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने