विमानतळ जागेची विक्री हा भ्रष्टाचारच

सांगली : कवलापूर येथील विमानतळाची १६० एकर जागा कुणालाही विश्‍वासात न घेता एमआयडीसीकडे वर्ग करणे आणि आता तीच जागा बेकायदेशीर पद्धतीने एका खासगी कंपनीला विकणे, हा संपूर्ण भ्रष्टाचारच आहे,’’ असा हल्लाबोल आज ही जागा वाचवण्यासाठी आयोजित बैठकीत करण्यात आला. ही जागा वाचवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा, न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ही लढाई राजकारणविरहित आणि पक्षीय भेद बाजूला ठेवून एकजुटीने लढण्याचा निर्णय झाला.



येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’मध्ये बैठक झाली. त्या वेळी कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांना निमंत्रक नियुक्त करण्यात आले. माजी आमदार नितीन शिंदे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंत पवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, हमाल पंचायतीचे विकास मगदूम, राष्ट्रवादीचे ॲड. अमित शिंदे, किरणराज कांबळे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जागा हडप करण्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग दिसत असून त्याविरोधात सर्वपक्षीय एकजूट दाखवू, असा निर्धार करण्यात आला.

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘विमानतळाच्या जागेचा श्री श्रीष्टा कंपनीसोबत झालेला व्यवहार आधी रद्द झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यानंतर या जागेवर विमानतळ, औद्योगिक विकास किंवा अन्य पर्यायांवर स्थानिकांना विश्‍वासात घेऊन विचार करता येईल.सध्या झालेला व्यवहार पूर्ण बेकायदा आहे. तो रद्द व्हावा, यासाठी कायदेशीर आणि रस्त्यावरचा लढा सुरू करतोय. त्याची सुरवात गुरुवारी (ता. ३)जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन होईल. त्यानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांना घेराव घालू. हा व्यवहार कसा झाला, याचा जाब विचारू. हे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत जाईल. व्यवहार रद्द होऊन त्याची संपूर्ण चौकशी होईपर्यंत माघार नाही.’’

नितीन शिंदे म्हणाले, ‘‘हा शंभर टक्के भ्रष्टाचार आहे. विमानतळ होणार नाही, असे जाहीर करून जागा हस्तांतरित केली. त्यानंतर ती कवडीमोल दराने एका कंपनीला विकली आणि ती कंपनी आता तीनशे-चारशे कोटी रुपयांना विकून मालामाल होईल. ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना काय मिळाले? हे आम्ही घडू देणार नाही.’’सतीश साखळकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी या विषयात बोलले पाहिजे. श्री श्रीष्टा कंपनीच्या आडून जागा हडप करण्याचा डाव सुरू आहे. त्याच्या विरोधात सर्व पातळ्यांवर लढा देऊ.’’बैठकीला शिवाजी त्रिमुखे, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील, मोहन शिंदे, प्रशांत भोसले, सतीश पवार, आनंद देसाई, संतोष कारंडे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद पाटील, गणेश निकम, श्री. तांबोळी, भीमराव पारेकर, अनिल शेटे, शीतल पाटील, विष्णू लवटे, राजेश सन्नोळी, सुशांत चव्हाण, कौशिक बेलवलकर, रोहित मोरे, तौहीद शेख, अमरदीप गाडेकर, सावकार व्हनकडे, कामरान अकमल आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने