सत्ता गेली म्हणून पुरोगाम्यांची फालतूगिरी! शरद पोंक्षेंची राष्ट्रवादीवर टीका

मुंबई :  चुकीचा इतिहास दाखवून प्रेक्षकांची आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने 'हर हर महादेव' या चित्रपटावर केला. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी चांगलेच राडे घातले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील यात सहभागी होते. या चित्रपटावरील वाद आता चांगलाच शिगेला पोहचला आहे. या चित्रपटावर आता अभिनेते आणि शिंदे गटाचे उपनेते शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत खरपूस शब्दात राष्ट्रवादीचा समाचार घेतला.



अभिनेते शरद पोंक्षे  समाज माध्यमांवर सक्रिय असून अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच ठाऊक आहे. आज त्यांनी माध्यमासमोर राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले आहे. 'हर हर महादेवचित्रपटाला नाहक विरोध केल्या प्रकरणी त्यांनी ही टीका केली.

राज्यातील सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही फालतू गिरी सुरू असल्याचा गंभीर आरोप पोंक्षे यांनी राष्ट्रवादीवर केला आहे. पुरोगाम्यांना हिंदू राष्ट्र म्हणणं आवडत नाही. हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र नको आहे याचा त्यांना‌ त्रास होतो. सत्ता गेल्याने यांची फालतू गिरी चालू आहे.' असे गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादीवर केले.'सेनसाॅर संमत असलेला चालू सिनेमा बंद पाडता. प्रेक्षकांना मारहाण करता. तुम्ही गुंड आहात का? स्वतःला पुरोगामी समजता ना? मग तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकरांनी हेच शिकवलं का? असे अनेक सवाल उपस्थित करत अप्रत्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला टोला लगावला. शरद पोंक्षे हे रात्री एका पुरस्कार कार्यक्रमासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी 'हर हर महादेव' चित्रपटाला होत असलेल्या विरोधानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने