पाण्याच्या बॉट्ल्स विकल्या, हॉटेलमध्ये राबला... 'कांतारा'चा हिरो कसा बनला सुपरस्टार?

मुंबई :  कांतारा सिनेमाचा मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या भलताच चर्चेत आहे. आणि चर्चा तर व्हायलाच हवी कारण ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' सध्या बॉक्सऑफिसवर सुसाट कमाई करत सुटला आहे. लिमिटेड स्क्रीन्सवर सिनेमा रिलीज होऊनही कांतारानं प्रेक्षकांवर मोठ्या प्रमाणात जादू केली आहे. ऋषभ शेट्टीची 'कांतारा' सिनेमातील दमदार व्यक्तीरेखा लोकांना भलतीच आवडलेली आहे.ऋषभ शेट्टीला पाहून लोक खूश होतायत खरं, पण हा ऋषभ शेट्टी नेमका आहे कोण? चला,आम्ही तुम्हाला अभिनेत्याविषयी काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगतो. 'कांतारा' सिनेमात आपल्या अभिनयाची दमदार झलक दाखवणारा ऋषभ शेट्टी सध्या पॅन इंडिया स्टार बनला आहे. त्याने आपल्या अभिनयानं लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. पण खूप कमी लोकांना माहीत आहे की ऋषभ शेट्टीनं 'कांतारा' सिनेमात अभिनय करण्या व्यतिरिक्त सिनेमाच्या कथेला लिहिलं देखील आहे आणि सिनेमाला दिग्दर्शित देखील केलं आहे.



ऋषभ शेट्टी आज साऊथ सिनेमाचा बडा स्टार बनला आहे,पण त्याच्यासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याने याठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ऋषभ शेट्टीनं तब्बल १८ वर्ष स्ट्रगल केलं तेव्हा कुठे तो आज जिथं पोहोचला आहे तिथं पोहोचणं त्याला शक्य झालं आहे.ऋषभ शेट्टीचं स्वप्न नेहमीच अभिनेता बनण्याचं होतं. त्याने कॉलेज पूर्ण झाल्यावर अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या करिअरची सुरुवात त्यानं थिएटरपासून केली. त्यानंतर त्यानं मालिकांमध्ये काम केलं. प्रेक्षकांचा तिथेही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या अभिनयाला आणि त्यातील हटके अंदाजाला लोक पसंत करू लागले. चाहत्यांच्या या प्रेमानेच ऋषभ शेट्टीचं स्वप्न पूर्ण करायला मदत केली आणि मग त्यानं ठरवलं की तो देखील एक मोठा अभिनेता बनू शकतो.

पण एका सर्वसामान्य मुलाला सुपरस्टार बनणं तितकं सोप्प मुळीच नसतं. ऋषभ शेट्टीनं कॉलेजच्या दिवसांतच छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली होती. रिपोर्ट्सनुसार कळत आहे की, ऋषभ शेट्टीनं अभिनेता बनण्याआधी पाण्याच्या बॉट्ल्स विकायला सुरुवात केली होती. त्याने हॉटेलमध्ये देखील काम केलं आहे. आणि ही कामं करता करता तो अभिनयात देखील आपलं नशीब आजमावत होता.असं म्हणतात तुमचं ध्येय तुम्हाला कधीच शांत बसू देत नाही. तुम्ही ध्येयाने झपाटलेले असाल तर कधीच हार मानत नाही,प्रयत्न करता. आणि म्हणूनच ऋषभ शेट्टीची मेहनत आणि प्रयत्न त्याला यशस्वी बनवून गेले. ऋषभ शेट्टीने २००४ मध्ये आपला पहिला सिनेमा Nam Areal Ondina केला. पहिल्या सिनेमात त्याची भूमिका खास काही नव्हती,फारच छोटी होती पण त्यानं आपल्या अभिनयानं त्या भूमिकेतही रंग भरून ती लक्षवेधी बनवली. त्याने अनेक वर्ष छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण हवी तशी ओळख त्याला इंडस्ट्रीत मिळत नव्हती,ज्याचं स्वप्न उराशी बाळगून तो अभिनय क्षेत्रात आला होता. अशा पद्धतीनं एक सुपरस्टार होण्यासाठी ऋषभ शेट्टीनं तब्बल १८ वर्ष स्ट्रगल केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने