ठाकरे गटाचे आमदार अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट

 मुंबई -राज्यात शिवसेना फुटली आणि दोन वेगळे गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षांतर सुरू झालं . अनेक बडे नेते पक्षांतर करताना दिसून आले. अशातच आता अनेक मोठे नेते पक्षांतर करणार असे दावे केले जातात. दरम्यान आता ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते कधीही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जातील असं अनेक नेते म्हणतात. त्यामुळे ठाकरे गट फूटणार का? अशी चर्चा अधूनमधून राज्याच्या राजकारणात सुरू असतात. आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ असून ते रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा जाधव यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.



प्रतापराव जाधवांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केलाय. उद्धव ठाकरे गटाचे आमदारच नाही तर अनेक खासदारही पक्षात नाराज आहेत. त्यामुळेच हे आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री अपरात्री येऊन भेट घेतात, असं प्रतापराव जाधव यांनी म्हंटलं आहे. पुढे ते म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात. मी स्वत: पाहिलं आहे. अनुभवलं आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.दरम्यान, शिवसेनेतून बंड करून बाहेर पडत 40 आमदारांसह 10 अपक्ष अशा 50 आमदारांनी काढता पाय घेतला. या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने