केजरीवालांचे भाजपला प्रत्युत्तर तिकिटे विकण्याचा आरोप

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून तिकिटाची खरेदी विक्री होत असल्याच्या भाजपने जारी केलेल्या स्टिंग व्हिडिओवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी“भाजपचे हे नवीन नाटक आहे”, या शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.आम आदमी पार्टीने एमसीडी निवडणुकीसाठी तिकिटे विकल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. याप्रकरणी केजरीवाल यांनी मौन का बाळगले आहे, असे भाजप नेते सातत्याने सांगत होते त्याला केजरीवाल यांनी आज पहिल्यांदा उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराचा दुसरा भाग गुजरातच्या प्रचारादरम्यान ऐकायला मिळेल असे मानले जाते.



भाजपने समोर आणलेल्या या स्टिंग ऑपरेशनवर केजरीवाल म्हणाले की, “भाजप दररोज एक नवीन नाटक दिल्लीकरांसमोर (नौटंकी) आणत आहे. कधी दारूचा घोटाळा झाल्याचे भाजप म्हणतो, त्याचीही चौकशी झाली. दारू घोटाळ्यात काहीही सापडले नाही. “हा केवळ घोटाळा होता, त्यात काहीही सापडले नाही”, असे हास्यास्पद विधान भाजप नेत्यांनी केले. मग शाळा खोल्या बांधकाम, बस वाहतूक यामध्येही भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार घोटाळा झाला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सूड घेण्याच्या भावनेने तपास यंत्रणांनी चौकशी केली. त्यापैकी एकाही प्रकरणात ठोस काहीच सापडले नाही, असे केजरीवाल म्हणाले. अगदी चार दिवसांपूर्वीही ते (भाजप नेते ) म्हणाले होते की, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात घोटाळा झाला. त्याचीही चौकशी भाजपने करून घ्यावी. त्यांना आणि तपास यंत्रणांना कोणीही अडवलेले नाही असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

दरम्यान महापालिका निवडणुकीच्या मतदानाला जेमतेम 13 दिवस राहिल्याने संसदेपासून काही पावलांवर असलेल्या दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयात सध्या प्रचंड गजबज आहे. स्टार प्रचारक आणि नेते यांची वर्दळ इथे वाढली आहे. भाजप रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर नवनवीन आरोप करत आहे. भ्रष्टाचार विरोधाचे नाव घेऊन स्थापन झालेला आम आदमी पक्ष आज संपूर्ण भ्रष्टाचारात बुडाला आहे. एकेकाळी भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या या पक्षाचे आता “हप्ता वसुली” हे एकच काम उरले आहे असा भाजप आरोप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.या ऑपरेशनमधून हे स्पष्ट झाले की केजरीवाल यांच्या पक्षाने केवळ महापालिका निवडणुकीतच नव्हे तर या आधीच्या विधानसभेच्या निवडणुकीतही तिकिटे विकली होती असा आरोप भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने