भाजपकडून कायदे कमकुवत; राहुल गांधी

 बुलढाणा : आदिवासींच्या सबलीकरणासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीने केलेले कायदे कमकुवत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. सत्तेत आल्यास आम्ही हे कायदे पुन्हा बळकट करू, असे आश्‍वासनही राहुल यांनी दिले. ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा अखेरचा दिवस होता. राहुल गांधी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे आदिवासी महिला कामगार संमेलनात सहभाग घेतला. यावेळी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर टीका करताना राहुल म्हणाले,‘आदिवासी हे या देशाचे ‘पहिले मालक’ आहेत.

इतर नागरिकांप्रमाणेच त्यांना समान अधिकार आहेत. पंचायत कायदा, वन अधिकार कायदा, जमीन हक्क, पंचायत राज कायदा आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण, असे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेले कायदे कमकुवत करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. पंतप्रधानांना आदिवासींची जमीन हिरावून घेत ती त्यांच्या उद्योगपती मित्रांना द्यायची आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली.



यात्रेला दोन दिवस ब्रेक

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला दोन दिवसांचा ब्रेक दिला आहे. नियोजनानुसार यात्रा रविवारी (ता. २०) मध्य प्रदेशाच्या सीमेत प्रवेश करणार होती; मात्र या दौऱ्यात बदल करण्यात आले असून राहुल गांधी सोमवारी गुजरातमध्ये पहिली प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा बुधवारी (ता. २३) मध्य प्रदेशात प्रवेश करेल.माझी आजी (इंदिरा गांधी) म्हणायची, आदिवासी हे या देशाचे मूळ मालक आहेत. आदिवासींचा इतिहास आणि त्यांची संस्कृती समजून घेतल्याशिवाय तुम्हाला देश समजून घेता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने