‘अमृत’चा आराखडा करताना ५० वर्षांचा विचार करा

कोल्हापूर : भविष्यातील पन्नास वर्षांचा विचार करून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करा. या योजनेतून ३६४ किलोमीटर ड्रेनेज लाईन होईल ती सरसकट धरू नये. पंचगंगा स्मशानभूमीमध्ये आणखी २४ बेडचा प्रस्ताव आहे. यासाठी सव्वादोन कोटी खर्च होईल, त्यामध्ये मी आणि आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार फंडातून एक कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित सव्वा कोटी महापालिकेने निधी द्या, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी आज दिल्या. आमदार सतेज पाटील यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍नांविषयी महापालिकेच्या ताराबाई पार्कातील निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.



आमदार पाटील म्हणाले, ‘‘अमृत योजनेतील दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. यातून नगररचना विभागाकडे सद्यस्थितीत दहा लाख चौरस फूट बांधकामासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे शहरात आवश्यक आहे, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा आराखडा तयार केला पाहिजे. शहरात पाच हजार स्क्वेअर फुटावरील बांधकामांना परवानगी देताना पावसाच्या पाण्याचा विचार केला जात नाही. आत ही अट घातली पाहिजे. याशिवाय हे पाणी कुठे जोडणार ते नकाशात दाखविणे बंधनकारक केले पाहिजे. तरच शहरातील पाण्याला शिस्त लागले.दरम्यान, थेट पाईपलाईनचे काम गतीने सुरू आहे. डिसेंबर महिन्यात दोन्ही जॅकवेल पूर्ण होतील. जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे. आता केवळ २९० मीटर काम शिल्लक राहिले आहे. यावेळी, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

आयटी पार्क होणार

गेल्या अनेक दिवसांपासून आयटी पार्कची चर्चा सुरु आहे. आता टेंबलाईवाडी येथे आय. टी. पार्क होणार आहे. काही दिवसांत निविदा प्रसिद्ध केली जाईल, असे ही आमदार पाटील यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिर’ विकास प्रस्ताव क्रेंद्राकडे पाठवा

केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचा विकास केला जाणार आहे. यासाठी २९३ कोटींचा आराखडा केला होता. प्रशासनाने यापैकी ९१ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. हा प्रस्ताव पालकमंत्री केसरकर यांच्यातर्फे केंद्र सरकारला पाठवावा, अशी विनंती केली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

स्मारकांचे काम लवकरच पूर्ण

पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल. शहरातील रस्त्यांची २१ कोटींची कामे सुरू आहेत. ती दर्जेदार झाली पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने