वर्ल्डकप फुटबॉलमध्ये तरी युद्ध थांबवा

इंडोनेशिया: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा ही भूतलावरचा सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा येत्या रविवारपासून कतारमध्ये सुरू होत आहे. किमान स्पर्धेच्या कालावधीत तरी युक्रेनमधील युद्ध बंद करा आणि ही स्पर्धा म्हणजे ‘सकारात्मक शांतीचा संदेश’ असा वापर करून मार्ग काढा, असे आर्जव जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने केले आहे.बाली येथे जी-२० देशांची परिषद सुरू आहे. तेथे बोलताना फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फांटिनो यांनी करातमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत शांततेचा संदेश देण्यासाठी वापर करा, असे मत मांडले.

ही विश्वकरंडक स्पर्धा महिनाभर चालणार आहे, सध्या किमान महिनाभरासाठी तरी युद्धबंदी करा आणि शांततेसाठी सकारात्मक बोलणी करण्यासाठी पावले उचला. तुम्ही सर्व जगाचे नेते आहात, तुमच्या शब्दांना वजन आहे. फुटबॉल आणि विश्वकरंडक ही एकात्मता आणि जगात सर्वत्र शांततेचा संदेश देण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे त्याचा वापर करा, असे इन्फन्टिनो यांनी म्हटले आहे.



रशियावर आहे बंदी

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली कतारमधील विश्वकरंडक स्पर्धा २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होत आहे. गतवेळची स्पर्धा रशियात झाली होती. मायदेशातील त्या स्पर्धेत रशियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. युक्रेनवर केलेल्या हल्यामुळे रशियावर या स्पर्धेतून बंदी घालण्यात आली आहे. युक्रेनचा संघ या स्पर्धेत पात्र ठरला असता, परंतु पात्रता स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात त्यांचा वेल्सकडून पराभव झाला.कतारमध्ये होत असलेली यंदाची स्पर्धा किमान ५.५ अब्ज लोक पाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला संदेश देता येईल, असेही इन्फन्टिनो म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने