मेस्सीचा गोल अन् कोल्हापूरात जल्लोष

 कोल्हापूर : कतारमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे वारे कोल्हापूरमध्ये जोरात वाहताना दिसले. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघांदरम्यानचा अंतिम सामना केवळ पाहण्यासाठीच नाही, तर अनुभवण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन उभारण्यात आल्या होत्या. अंतिम सामन्यात फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मेस्सीने अधिक वेळेत गोल नोंदवत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. हा गोल होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. अर्जेंटिनाच्या विजयाने शहरात पुन्हा दिवाळी साजरी झाली.




विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच शहरभरामध्ये फुटबॉलचे रंग पसरू लागले होते. मुख्य चौकच काय, तर गल्लीबोळातून देखील आवडत्या संघासह खेळाडूंचे भले मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले होते. स्पर्धा पुढे जाईल तशी चुरस वाढली. काही पाठीराख्यांचा हिरमोड झाला, तर काहींच्या आशा अधिक पल्लवित झाल्या. अखेर विश्वविजेता ठरण्याचा दिवस आल्याने फुटबॉल प्रेमींनी सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी स्क्रीन उभारल्या, बैठक व्यवस्था केली, साउंड सिस्टमने माहोल तयार केला. अशा जल्लोषी वातावरणात अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सचा अंतिम सामना झाला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच फ्रान्सने जलद खेळ करत वाहवाही मिळवली. मात्र, अर्जेंटिनाच्या चिवट बचावापुढे यश मिळवता आले नाही. या सामन्याने फुटबॉलप्रेमींना मात्र सर्वोत्कृष्ट सामना अनुभवायला मिळाला.

वडगावकर परिवाराचा व्हिडिओ

वडगावकर परिवाराने कतारमध्ये कोल्हापुरातील सोळा तालमींच्या किटसह छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे पोस्टर घेऊन उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

पेनल्टी विजय आणि हुरहूर

सामन्याच्या पूर्ण वेळेत व अधिकच्या वेळेत देखील बरोबरीत राहिल्याने पेनल्टी घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक गोलबरोबर जल्लोष अन् हुरहूर देखील वाढत होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने