‘मोदी सरकार निद्रिस्त’ म्हणणाऱ्या राहुल गांधींना परराष्ट्रमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले “तुमच्या आदेशानुसार चीनच्या सीमेवर…”

दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपा सरकार तैवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेला संघर्ष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच चिनी सैनिक नियंत्रण रेषेपासून पुढे सरकत असून केंद्र सरकार मात्र वारंवार नकार देत असल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.एस जयशंकर यांनी राहुल गांधींचा उल्लेख टाळत म्हटलं की “लोक अनेक चर्चा करत असतात. ते कदाचित विश्वासार्ह नसतील. कधीतरी ते आपल्याच भूमिका आणि वागण्यामधील मतभेद दाखवतात”.



एस जयशंकर यांनी यावेळी चिनी सीमेवर भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करण्याचं कारण सांगितलं. २०२० पासून सीमेवर चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. “जर आम्ही नकारच देत असतो,तर तिथे लष्कर कशाला तैनात केलं असतं? राहुल गांधींनी सांगितलं आहे म्हणून तिथे सैन्य तैनात नाही आहे. पंतप्रधानांनी आदेश दिल्यानेच ते तिथे आहेत,” असं एस जयशंकर म्हणाले. “आम्ही चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) एकतर्फी बदलू देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

चीन युद्धाच्या तयारीत, मोदी सरकार निद्रिस्त! राहुल गांधी यांची टीका

अरुणाचल प्रदेश आणि लडाख सीमा भागात चीन युद्धाची तयारी करीत आहे, तर नरेंद्र मोदी यांचे सरकार निद्राधीन राहून संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले,‘‘चीनचा वाढता धोका मला अगदी स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी त्याकडे लक्ष वेधत आहे, पण सरकार मात्र दुर्लक्ष करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही वा तो लपवलाही जाऊ शकत नाही. मोदी सरकार काहीही ऐकून घेण्यास तयार नाही.’’

चीनची जोरदार तयारी सुरू आहे आणि ती युद्धासाठीच आहे, घुसखोरीसाठी नाही. त्यांच्या शस्त्रांचे स्वरूप आणि हालचाली पाहिल्या तर सर्व काही लक्षात येईल. पण मोदी सरकार हे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण सत्य स्वीकारणे त्याला जड जाते, अशी टीका राहुल यांनी केली. मोदी सरकार कार्यक्रमाधारित काम करते, धोरणात्मकृष्टय़ा नाही, त्यामुळेच हे घडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.चीनने २००० किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर २० जवानांचाही बळी घेतला आहे. शिवाय, हल्लीच अरुणाचल प्रदेशात आपल्या जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला, असेही राहुल म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने