जिग्नेश मेवाणीसुद्धा बनले कोल्हापूरचे फॅन, 'इथलं शेती तंत्रज्ञान गुजरातमध्ये पोहोचविणार'

कोल्हापूर:  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची परिपूर्ण माहिती घेऊन गुजरातमधील शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा, यासाठी येथील शेतीचे तंत्रज्ञान गुजरातमध्ये पोचविणार आहे, असे गौरवोद्‌गार आमदार जिग्नेश मेवाणी यांनी काढले. तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, प्रदर्शनाचे आयोजक आमदार सतेज पाटील व पाहुण्यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून उद्‌घाटन झाले.आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘शेती व दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना ऐंशी टक्के कर्जपुरवठा केला जात आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून गाई- म्हशीच्या दूधाला जादा दर दिला आहे. सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बी- बियाणे, शेती अवजारे, शेतीमधील उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना, कृषी तज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.’



आमदार सतेज पाटील प्रास्ताविकात म्हणाले, ‘अनेक शेतकऱ्यांची कुटुंबं विभक्त होत असल्याने शेतीचे तुकडे पडत आहेत. तरीही येथील शेतकरी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस पिकवून आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये आणखी भर पडावी, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.’आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, डॉ. संजय डी पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, सुरेश साळोखे, सत्यजित पाटील, संजय घाटगे, राजीव आवळे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, गुलाबराव घोरपडे, व्ही. बी. पाटील, कर्णसिंह गायकवाड, सत्यजित जाधव, अमरसिंह पाटील, भैय्या माने, शशांक बावस्कर, सुनील शेंत्रे, सचिन चव्हाण, तेजस पाटील, विनोद पाटील, धीरज पाटील आदी उपस्थित होते.

ऊस उत्पादनावर आज व्याख्याने

‘सातत्यपूर्ण एकरी शंभर टन ऊस उत्पादन’ या विषयावर प्रदर्शनात उद्या (ता. २४) व्याख्याने होणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत पुण्यातील कृषी विद्या विभाग नेटाफिन इरिगेशनचे प्रमुख अरुण देशमुख संवाद साधणार आहेत. साडेबारा ते दोन या वेळेत शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी सुरेश कबाडे संवाद साधतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने