मशीद पाडण्यापूर्वीदेखील अयोध्यात झाल्या होत्या दंगली; वाचा बाबरीचा इतिहास

आयोध्या : मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने आयोध्येत मशीद बांधली होती, जी बाबरी मशीद म्हणून ओळखली जायची, असे मानले जाते की, ही मशीद मीर बाकीने त्याचा सम्राट बाबरच्या नावावर बांधली होती. बाबर १५२६ मध्ये भारतात आला. १५२८ पर्यंत त्याचे साम्राज्य अवधपर्यंत (सध्याचे अयोध्या) पोहोचले. यानंतर, सुमारे तीन शतकांच्या इतिहासाची माहिती कोणत्याही ओपन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीये.



१८५३ : ...जेव्हा पहिल्यांदा आयोध्येत दंगल उसळली

१८५३ मध्ये पहिल्यांदा आयोध्या मंदिर-मस्जिद मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी निर्मोही आखाड्याने रचनेवर दावा केला आणि मशीद ज्या ठिकाणी उभी आहे तिथे पूर्वी मंदिर होते असे सांगितले. जी बाबरच्या काळात नष्ट झाली होती. या मुद्द्यावरून पुढील 2 वर्षे अवध (सध्याचे अयोध्या) येथे हिंसाचार भडकत राहिला.त्यानंतर १८८३ मध्ये हिंदूंनी मंदिर बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मुस्लिमांच्या विरोधानंतर उपायुक्तांनी १९ जानेवारी १८८५ रोजी कोणत्याही प्रकारच्या मंदिराच्या बांधकामावर बंदी घातली. त्यानंतर २७ जानेवारी १८८५ रोजी राम चबुतराचे हिंदू महंत (पुजारी) रघुबर दास यांनी फैजाबाद सब-न्यायाधीशांसमोर दिवाणी दावा दाखल केला. याच्या प्रतिदाव्यात मशिदीच्या मुस्लिम विश्वस्तांनी संपूर्ण जमीन मशिदीची आहे असल्याचा युक्तीवाद केला.

२४ डिसेंबर १८८५ रोजी उप न्यायाधीश पंडित हरी किशन सिंग यांनी हा खटला फेटाळून लावला. तसेच १८ मार्च १८८६ रोजी जिल्हा न्यायाधीश एफ.ई.ए. चामियर यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेले अपीलही फेटाळून लावत. हिंदूंनी पवित्र मानलेल्या भूमीवर मशीद बांधण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु हे प्रकरणावर तोडगा काढण्यास उशीर झाल्याने आहे ती परिस्थीती ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

गो हत्येमुळे उसळली दंगल

२७ मार्च १९३४ रोजी अयोध्येत हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. बकरी ईदवेळी, गोहत्येच्या घटनेवरून येथे सांप्रदायिक दंगलीला तोंड फुटलं होते. त्यावेळी बाबरी मशिदीचं नुकसान झालं होतं. पण ब्रिटिश सरकारने बांधकामाची दुरुस्ती करून घेतली.

शिया-सुन्नी वाद

१९३६ साली नवीन वादाला तोंड फुटलं - मशिदीच्या मालकीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम गटांमध्ये वाद सुरू झाला. जिल्ह्याच्या वक्फ आयुक्तांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले.मशीद बांधणारा मीर बाकी हा शिया होता, त्यामुळे ही मशीद शिया समुदायाची आहे, असा दावा मशिदीचे व्यवस्थापक मोहम्मद झाकी यांनी केला होता.वक्फ आयुक्तांनी या वादाची चौकशी सुरू केली. चौकशीत असा निष्कर्ष निघाला की, ही मशीद सुन्नी लोकांची होती, कारण ती सुन्नी असलेल्या बाबरने बनवली होती. याबाबतचा अंतिम अहवाल २६ फेब्रुवारी १९४४ रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. १९४५ मध्ये शिया केंद्रीय मंडळाने या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर २३ मार्च १९४६ रोजी न्यायाधीश एस.ए. अहसान यांनी यूपी सुन्नी सेंट्रल बोर्ड ऑफ वक्फच्या बाजूने निकाल दिला. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने