बिल्किस बानोची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : गुजरातमधील सामूहिक बलात्कार आणि कुटुंबीयांच्या खूनप्रकरणातील दोषींच्या सुटकेला पीडिता बिल्किस बानोने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. या दोषींच्या सुटकेमुळे समाजाच्या विवेकबुद्धीला मोठा धक्का बसल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. दोषींच्या सुटकेबरोबरच यातील एका दोषीने सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने १३ मे २०२२ रोजी दिलेल्या निकालाचा फेरआढावा घ्यावा अशी मागणी करणारी आणखी एक याचिका बिल्किस बानोच्यावतीने सादर करण्यात आली आहे. तत्पूर्वी याच मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने देखील गुजरात सरकारवर ताशेरे ओढले होते. बिल्किस बानो यांच्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केली होती.



सर्वोच्च न्यायालयाने देखील या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी.एस. नरसिंह यांच्या पीठाने विधिज्ञ शोभा गुप्ता यांनी मांडलेले म्हणणे लक्षात घेत या प्रकरणी सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली. याच प्रकरणात अन्य याचिका देखील न्यायालयामध्ये सादर झाल्या होत्या त्यांची न्या. अजय रस्तोगी यांच्यासमोर सुनावणी झाली होती. रस्तोगी हे घटनापीठाचाच भाग होते, असे गुप्ता यांनी सांगताच ‘सुरवातीला फेरविचार याचिकेवर सुनावणी होऊ द्या. त्या आधी न्या. रस्तोगी यांच्यासमोर याव्यात,’ असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले.या प्रकरणातील अकराही दोषींची यंदा १५ ऑगस्ट रोजी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठविली होती. अनेकांनी गुजरात सरकारला देखील आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले होते. याच मुद्यावरून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीका झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने