“मी क्रिकेट पाहत नाही, मी त्याला ओळखलं नाही! तो खिडकीतून अर्धवट…”; पंतचा जीव वाचवणाऱ्या बस चालकाने सांगितला घटनाक्रम

दिल्ली: हरयाणा परिवहन महामंडळाच्या बस चालकाने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवण्यासाठी मदत केली. पंतच्या मर्सिडीज गाडीमधून त्याला बाहेर पडून गाडी जळण्याआधी दूर नेणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये या चालकाचाही समावेश होता. मात्र पंतला मदत करणाऱ्या या बस चालकाला जखमी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा हीच अंदाज नव्हता अशी माहिती समोर आली आहे. या बस चालकाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं.



सुशील मान असं या बस चालकाचं नाव आहे. सुशील यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या माहितीनुसार समोरुन फार वेगाने एक एसयुव्ही गाडी आली आणि ती दुभाजकाला धडकली. “मी बस बाजूला घेतली आणि खाली उतरुन अपघात झालेल्या गाडीच्या दिशेने धावलो,” असं सुशील यांनी सांगितलं. “ज्या वेगात अपघात झाला ते पाहता ही गाडी आपल्या बसला आदळेल असं मला वाटलं. कारण धडक दिल्यानंतर गाडीने अनेकदा पलटी मारली आणि नंतर ती थांबली,” असं सुशील म्हणाले.

“गाडीचा चालक (पंत) खिडकीमधून अर्थवट बाहेर आलेल्या अवस्थेत होता. त्याने मला तो क्रिकेटपटू असल्याचं सांगितलं,” असं सुशील मान म्हणाले. तसेच पंतने मला त्याच्या आईला फोन लावण्यास सांगितलं. मात्र त्याचा फोन बंद होता, असंही सुशील मान या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.“मी क्रिकेट पाहत नाही मला ऋषभ पंत कोण आहे हे ठाऊक नाही. मात्र माझ्या बसमधील इतर लोकांनी त्याला ओळखलं,” असं सुशील यांनी सांगितलं. “पंतला कारमधून बाहेर काढल्यानंतर आम्ही लगेच त्याच्या कारमध्ये काही सामन आहे का तपासलं. मी त्याच्या निळ्या रंगाच्या बँगमधून सात ते आठ हजार रुपये काढून तो रुग्णवाहिकेमध्ये बसलेला असताना त्याच्या हातात टेकवले,” असं सुशील म्हणाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. पंत त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असतानाच हा अपघात झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने