कोरोना खर्चाची चौकशी नको! मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कॅगला पत्र?

मुंबई:  कोरोना काळात महापालिकेने केलेली कामे, खर्चाची चौकशी कॅगने (नियंत्रक व महालेखा परीक्षक) सुरू केली आहे. गेल्या महिन्यापासून कॅगचे अधिकारी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. यामुळे पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून पालिका आयुक्तांनी कॅगला पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. कोरोना काळातील खर्चाची चौकशी करू नका, अशी विनंती त्यात केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



राज्य सरकारच्या परवानगीनंतर कॅगने पालिकेतील कामांची चौकशी सुरू केली आहे. कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर उभारणे, काँक्रीटीकरण, तसेच काही पुनर्विकासाच्या कामांची चौकशी सुरू आहे. कोरोना काळात विविध १२ हजार कोटींच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.त्यानुसार सरकारने या कामांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती होती. अशा आपत्तीमधील खर्चाचा चौकशी करता येत नसल्याचे पत्रातून कळवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे कोरोना काळातील कामांची चौकशी करू नये, असेही पत्रात म्हटल्याचे सांगितले जात आहे.


निवृत्त अधिकाऱ्यांवरही दबाव

कॅगने पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयात जाऊन चौकशी सुरू केली आहे. जे अधिकारी निवृत्त झाले किंवा ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे, त्यांची चौकशीदेखील सुरू आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून चिंता पसरली आहे. त्यांच्या दबावातच पालिकेने कॅगला पत्र लिहिल्याचे कळते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने