चीनचे कोविड निर्बंध केव्हा संपणार?

बीजिंग : कोरोना प्रतिबंधासाठी लादलेले जगातील काही सर्वाधिक कठोर निर्बंध चीन शिथिल करीत आहे. कोविड विषाणूचे नवे प्रकार तुलनेने कमकुवत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अजूनही लाखो नागरिकांना घरात थांबण्यास भाग पाडणारे शून्य कोविड धोरण केव्हा संपुष्टात आणणार याविषयी कोणतेही संकेत देण्याची चीनची तयारी नाही. सोमवारी बीजिंगसह इतर किमान १६ शहरांमध्ये कित्येक महिन्यांच्या कालावधीनंतर प्रवाशांना प्रथमच कोविड चाचणीशिवाय प्रवास करता आला. याआधी मागील ४८ तासांमधील चाचणी अनिवार्य होती. हाँगकाँगजवळील ग्वांगझूसह औद्योगिक केंद्रांमधील बाजारपेठा आणि व्यवसाय सुरु झाले आहेत. संसर्ग असलेल्या शेजारच्या उपनगरांमध्ये मात्र बाहेर पडण्यावरील निर्बंध कायम आहेत.

मॉर्गन स्टॅनलेचा इशारा

व्यवहार वेगाने पुन्हा सुरु करण्याची चीनची अजूनही तयारी नाही. निम्न-श्रेणीच्या शहरांमध्ये रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यास कडक निर्बंध लक्षणीयरित्या पुन्हा लादले जातील, असा अहवाल मॉर्गन स्टॅनले कंपनीच्या अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.



जनतेचा रोष...

कम्युनिस्ट पक्षाने विलगीकरण आणि इतर निर्बंध शिथिल करण्याची आश्वासने दिली होती. त्यानुसार शून्य कोविड धोरण संपुष्टात आणले जावे म्हणून शांघाय आणि इतर काही शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. तेथे जनतेचा रोष दाबण्यासाठी बळाचा वापर झाला का हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. २५ नोव्हेंबर रोजी निदर्शने सुरु झाली. वायव्येकडील उरुमक्वी येथे एका सदनिकेत आग लागून किमान दहा जणांचा बळी गेला. दरवाजे बंद असल्यामुळे किंवा अन्य काही निर्बंधांमुळे अग्नीशमनविरोधी जवानांचा किंवा बळींचा मार्ग अडल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. जनतेचा सारा रोष मात्र या दुर्घटनेवर केंद्रित झाला आहे.

लसीकरणासाठी २०२४ उजाडणार?

चीन सरकारने गेल्या आठवड्यात ७० ते ८० वय असलेल्या लाखो नागरिकांच्या लसीकरणाची योजना जाहीर केली. शून्य कोविड निर्बंध संपुष्टात आणण्यासाठी हे महत्त्वाचे असेल, मात्र तसे होण्यासाठी २०२३चा मध्य किंवा कदाचित २०२४ वर्ष उजाडेल असे तज्ज्ञ म्हणतात.

नवे रुग्ण ३०,०१४

सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३०,०१४ असल्याचे जाहीर करण्यात आले. यातील २५,६९६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. गेल्या आठवड्यात रुग्णांचा आकडा ४० हजारापेक्षा जास्त होता. त्यात घट झाली असली तरी विक्रमी संख्येच्या आसपास रोजचा आकडा जात आहे.

श्रेष्ठत्वासाठी शून्य कोविड धोरण

अमेरिकेसह जवळपास साऱ्या जगात कोरोना निर्बंध उठविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा सामना करीत जगण्याचा निर्धार करण्यात आला आहे. चीन मात्र यास अपवाद आहे. सत्ताधारी शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट सरकारने अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत आपल्या श्रेष्ठत्वाची सिद्धता व्हावी म्हणून शून्य कोविड धोरणाचा अवलंब केला आहे. चीनमध्ये कोरोना बळींचा अधिकृत आकडा अजूनही केवळ ५,२३५ इतकाच आहे. हेच अमेरिकेतील आकडा ११ लाखाच्या घरात आहे. चीनमध्ये कर्करोग, ह्रदयविकार आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती मरण पावल्या. कोरोना रुग्णांना प्राधान्याने उपचार देण्यात आल्यामुळे त्यांची आबाळ झाली. अशा बळींचा आकडा मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने