OTT वर खूप काही पाहण्यासारखे होते, आपले लक्ष होते कुठे?

मुंबई: कोरोना काळात, विशेषता लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड प्रमाणात होत होता. कालांतराने न्यू नॉर्मल म्हणजे कोरोना नंतरच्या काळात वातावरण मोकळे झाल्यानंतर वापर कमी होत गेला. २०२२ हे वर्ष ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी संमिश्र प्रकारचे होते.आता चित्रपट अनिर्बंधपणे प्रदर्शित होत आहेत व काही कालावधी नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त त्याच प्लॅटफॉर्मसाठी तयार केल्या गेलेल्या ‘ओरीजनल्स’ च्या माध्यमातून आपला प्रेक्षकवर्ग टिकवण्याची धडपड करत आहे. मात्र या प्रयत्नांना फारसे यश येतांना दिसत नाही. या चढाओढीत सर्वात पुढे आहे साहजिकच नेटफ्लिक्स. २०२२ या वर्षात नेटफ्लिक्सने सर्वात जास्त संखेने चित्रपट, टीव्ही शोज, सिरीज प्रदर्शित केलेल्या आहेत. या तुलनेत इतर प्लॅटफॉर्मला या जवळपासही पोहचता आले नाही.



२०२२ या वर्षात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या शो मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण शो आहेत. यामध्ये थायलंड मधील गुहांमध्ये अडकलेल्या लहान फुटबॉल खेळाडूंच्या सुटकेच्या घटनेवर आधारित ‘Thai Cave Rescue’ ही सिरीज आवर्जून पहावी अशी आहे. ही घटना जगाने वेगवेगळ्या माध्यमातून अनुभवलेली होती, त्यामुळे त्यात आता काय नवीन बघायचं असं वाटू शकतं, परंतु या घटनेचे  चित्रण व कथेची मांडणी खूप उत्कंठावर्धक व औसुक्यपूर्ण पद्धतीने केलेले आहे. पडद्यावर घटना साकारताना कथेला दिलेला Human Touch अगदी प्रभावीपणे जाणवतो. तो अनुभव सिरीज पाहून घ्यावा असाच आहे. विशेषतः लहान मुलांसाठी हा खूपच प्रेरणादायी अनुभव आहे.आजच्या जागतिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा ‘Dont Look Up’ हा आवर्जून बघावा असा वेगळ्या धाटणीचा चित्रपट. बहुतांश जग सत्तांतरातून अति उजव्या व मुलतत्ववादी विचारांकडे ओढले जात असतांना, आपल्या पुढे भविष्यात काय मांडून ठेवले आहे याचा मिश्कील शैलीतला हा अनुभव आहे. सध्याच्या मौज मस्तीच्या टींडरमय जगातला ‘The Tinder Swindler’ हा माहितीपट नागवल्या गेलेल्या महिलांची विदारक परिस्थिती दाखवतो.

भारतीय निर्मितीमध्ये ‘She’ आणि ‘Jamtara - Sabka Number Ayega´या सिरीजचे पुढील सिझन आधीच्या एवढे प्रभावित करू शकले नाही. पुढील भागांतील कथानक आधीच्या सिझन पासून भरकटलेले वाटते. Delhi Crime 2 मात्र याला अपवाद ठरावी. Yeh Kaali Kaali Ankhein आणि Khakee: The Bihar Chapter ह्या दोन नवीन सिरीज मात्र भाव खाऊन गेल्या. चित्रपटांच्या बाबतीत दसवी, डार्लिंग हे वेगळ्या विषय आणि मांडणीचे चित्रपट पाहण्यासारखे आहेत. 83 व शाब्बास मिथ्यु हे दोन क्रिकेट विषयीचे चित्रपट त्या त्या खेळाडूंच्या जडण घडणीची उकल करतात. ती समजून घेण्यासारखी आहे.‘शेरदिल’ हा मात्र आवर्जून पहावा असा चित्रपट. उपेक्षितांचे जगणे साध्या नर्म विनोदी पद्धतीने मात्र प्रखरपणे मांडलेले यात पहायला मिळेल. हे पाहताना पंकज त्रिपाठी आणि नीरज काबी यांच्या सहज अभिनयाची प्रशंसाही करता येईल. सोनी लिवचा इतर सोनीच्या प्लॅटफॉर्मसारखा क्राईम आणि कॉमेडी यावर जास्त भर असतो. सोनी लिववर Undekhi Season 2, Scam 2003: The Telgi Story, Maharani 2 ह्या क्राईम सिरीजचे पुढील भाग आधीच्याच लईत पुढे जाणारे आहेत. Tanaav ही यावर्षी यात नवीन पडलेली भर. कॉमेडीच्या बाबतीत गुल्लकचा तिसरा सिझनही आधी एवढाच मजेशीर आहे. Nirmal Pathak ki Ghar Vapsi आणि The Salt City हा थोड्या क्विर्की पद्धतीचा पण मजेशीर अनुभव जरूर घ्यावा असा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने