पळसे चौफुलीवर बर्निंग बसचा थरार!; दुचाकीवरील दोघे ठार, 25 प्रवासी जखमी

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गाव चौफुलीवर ब्रेक फेल झालेल्या भरधाव वेगातील राजगुरूनगर-नाशिक या बसने तीन दुचाकींसह शिर्डी-नाशिक बसला पाठीमागून धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये एका दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार, तर दोघे दुचाकीस्वार गंभीर, तर बससह कारमधील असे २५ प्रवासी जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सदरचा अपघात गुरुवारी (ता. ८) दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या दरम्यान झाला. या प्रकरणी राजगुरूनगर-नाशिक बसचालक राजेंद्र उईके यांनी बस भरधाव चालवून प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न केला. तसेच दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरूनगर-पुणे ही परिवहन महामंडळाची बस (एमएच ०७, सी ७०८१) नाशिकच्या दिशेने भरधाव येत होती. शिंदे टोलनाका ओलांडल्यानंतर बस पळसेगाव चौफुलीजवळ आली असता, गतिरोधक पाहून बसचालक राजेंद्र अंबादास उईके (वय ३६, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी बसला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे भरधाव वेगातील या बसने पल्सर दुचाकीला (एमएच १७ सीजे ४८७४) पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील रवींद्र सोमनाथ विशे (वय ३०), मदन दिनकर साबळे (३९, रा. दोघे रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. नगर) हे दुचाकीसह बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. तर बसने अव्हेंजर दुचाकी (एमएच १५, एचई ३३१९) व युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५, जीडब्ल्यू ९२०१) यांनाही धडक दिल्याने या दुचाकीवरील महेश शंकर क्षत्रिय (रा. सिन्नर), नवनाथ छबू गिते (४२, रा. वडझिरे, ता. सिन्नर) हे दोघे गंभीर असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर या बसने शिर्डीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसला (एमएच १४, बीटी ३६३५) पाठीमागून धडक दिली. यात धडक बसताच बस पुढे असणाऱ्या क्रेटा कारवर (एमएच १७, बीव्ही ७३५८) जाऊन आदळली. या विचित्र अपघातांमध्ये तीन दुचाकी, दोन बस आणि दोन कारचे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

...अन्‌ बसने पेट घेतला

राजगुरूनगर बसखाली आलेल्या दुचाकींनी पेट घेतल्याने बसनेही पेट घेतला. ही बाब लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धाव घेतली. काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचविला, तर त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी बसच्या दिशेने धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच आगीने बसला वेढा घातला आणि काही क्षणात बस खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

आयुक्त घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पौर्णिमा चौघुले, जिल्हा आरटीओ प्रदीप शिंदे, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, सिद्धेश्वर धुमाळ व पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आयुक्त नाईकनवरे यांनी जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने