शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावली होती देशातली पहिली मालगाडी!

मुंबई : रेल्वे फाटक पडल्यावर रूळावरून मालगाडी धावत असेल तर आपण वैतागून जातो. कारण मालगाडी रूळावरून संथ गतीने जात असते. देशातली पहिली मालगाडी आजच्याच दिवशी धावली होती. तेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ती धावली होती. काय होता तो प्रसंग पाहुयात.साधारणपणे १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात ठाणे ते बोरीबंदर या दरम्यान पहिल्यांदा रेल्वे धावली असे सांगितले जाते. यासाठी दहा हजार कामगारांनी कष्ट उपसले होते. या रेल्वेत ४०० लोकांनी प्रवास केला होता. असे सांगितले जाते.



खरे तर याआधी देखील भारतात रेल्वे धावली होती आणि ती महाराष्ट्रात नव्हे तर उत्तराखंडमधील रेल्वे मार्गावरून धावली होती, अशी कागदोपत्री नोंद आहे. भारतात जी पहिली रेल्वे धावली ती एक मालगाडी होती.ही मालगाडी २२ डिसेम्बर १८५१ रोजी रुरकी ते पिरान कलियर या मार्गावर धावली होती. याबद्दलची माहिती ही २००२ साली “रिपोर्ट ऑन गंगा कॅनाल” या रिपोर्टमध्ये मिळते. २२ डिसेम्बर १८५१ रोजी रुरकी ते पिरान कलियर या दरम्यान असलेल्या रेल्वे लाईनवर वाफेच्या इंजिनावर दोन बोगी असलेली मालगाडी चालवली गेली होती. म्हणूनच भारतात रेल्वेची सुरुवात ही १८५१ सालीच झाली आहे.

“रिपोर्ट ऑन गंगा कॅनल” हे पुस्तक ब्रिटिश लेखक पी. टी. कॉटले यांनी लिहिलेले आहे. पुस्तकात म्हटले आहे की, गंगा-यमुना खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिशांनी १८५१ मध्ये कालव्यातून सोनाली जलवाहिनी काढण्याची योजना आखली. ज्यासाठी भरपूर माती लागते. ही माती रुरकीपासून १० किमी दूर असलेल्या पिरान येथून आणावी लागत होती. त्यासाठी या योजनेचे मुख्य अभियंता थॉमसन यांनी इंग्लंडहून वाफेचे रेल्वे इंजिन मागवले होते.या इंजिनला 180-200 टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या दोन बोगी जोडण्यात आल्या. ही रेल्वे 10 किलोमीटरचे हे अंतर 38 मिनिटांत कापायची. म्हणजेच त्याचा वेग ताशी 6.44 किलोमीटर होता. ही ट्रेन फक्त 9 महिने धावू शकली होती. 1852 मध्ये एका अपघाती अपघातात तिच्या इंजिनला आग लागली, पण तोपर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले होते.

दोन वर्षांनी १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर पहिली पॅसेंजर ट्रेन चालवली गेली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपी रेल्वे) या कंपनीने ही सेवा सुरु केली होती. त्यानंतर देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या आल्या परंतु जीआयपी रेल्वेने भारतात रेल्वेचे युग सुरु केले. १८४५ साली जमशेदजी आणि नाना शंकरशेट यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे संघाची स्थापना झाली. ते त्यावेळच्या रेल्वे कंपनीचे संचालक होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने