महाराष्ट्राला आठव्यांदा दुहेरी मुकुट; राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धा

ओडिसा : महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिसाला, तर महाराष्ट्राच्या कुमारांनी दिल्लीला नमवून दुहेरी सुवर्णमय कामगिरी केली. महाराष्ट्राचा हा सलग आठवा दुहेरी मुकुट ठरला असून कुमारांचे ३३ वे, तर मुलींचे २४ वे अजिंक्यपद आहे.उस्मानाबादचा किरण वसावे (वीर अभिमन्यू) व सोलापूरची प्रीती काळे (जानकी) हे या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धा झाली.मुलींच्या गटात महाराष्ट्राने ओडिसाचा १६-१० असा ६ गुणांनी धुव्वा उडवत रुबाबात अजिंक्यपदाला गवसणी घातली. 




महाराष्ट्रातर्फे प्रीती काळे (२.३०, २ मि. संरक्षण व ४ गुण), दीपाली राठोड (२.२०, २ मि. संरक्षण व २ गुण), संपदा मोरे(१.५०, २ मि. संरक्षण व ३ गुण), वृषाली भोये (३ गुण) यांच्यासह कर्णधार अश्विनी शिंदे (१.२०, २ मि. संरक्षण) यांनी विजयात बहारदार कामगिरी करत सलग विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला. प्रीती काळेने पाचव्या गुणासाठी ओडिसाला चांगलेच झुंजवले.कुमार गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर २२-१४ असा ८ गुणांनी विजय मिळवत दमदार कामगिरीची नोंद केली. किरण वसावे (१.५०, २.१० मि. संरक्षण व ३ गुण), सूरज झोरे (१.३०, १ मि. संरक्षण व ४ गुण), विवेक ब्राम्हणे(१.२० मी संरक्षण व ५ गुण), निखिल सोड्ये (१.४०, १.३० मि. संरक्षण), चेतन बिका (१.२० मी. संरक्षण व २ गुण) यांनी छान खेळ केला. पराभूत दिल्लीतर्फे मिरजुल (२ मी. संरक्षण व ९ गुण), दीपेंद्र (१,१.२० मी. संरक्षण) यांनी चुणूक दाखवली.

डॉ. अमित ठरताहेत देवदूत

खो-खो हा वेगवान खेळ म्हणून ओळखला जातो. लाल मातीमधील हा खेळ मॅट वरही आला. खेळाडूंना मैदानावर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी महाराष्ट्र खो-खो संघटनेने संघाबरोबर फिजिओ नेमला आहे.सांगलीचे खो-खोपटू डॉ. अमित रावटे हे फिजोओचे काम उत्तमरीतीने बजावत आहेत. बन्सबेरिया येथील या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी देशभरातील अनेक खेळाडूंसाठी डॉ. अमित देवदूत बनले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने