आता महिलाही बनू शकणार मरिन कमांडो; नौदलाचे ऐतिहासिक पाऊल

 मुंबई : एनडीए प्रवेशाचे मार्ग मोकळे झाल्यानंतर आता कमांडो बनण्याचीही संधी महिलांना मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी आशा आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये  महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.प्रथमच महिलांना लष्करामध्ये कमांडो म्हणून काम करण्याची मुभा मिळाली आहे. रविवारी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 



महिलांना प्रथमच मिळतेय अशी संधी

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमधील कमांडोंना कठोर प्रशिक्षण दिले जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त कारवाया करण्याची जबाबदारी सोपवली जाते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो तरबेज असतात. आतापर्यंत फक्त पुरूषच कमांडो बनू शकत होते; पण आता भारतीय नौदलातील महिलांनाही कमांडो होण्याची संधी मिळणार आहे.

महिलांना मार्कोस होण्याची संधी

कठोर प्रशिक्षणानंतर सर्व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना नौदलात मरिन कमांडो  म्हणजे मार्कोस बनण्याची संधी मिळेल. भारताच्या लष्करी इतिहासाचा विचार करता हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. यापैकी कोणालाही थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल.पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोस प्रशिक्षण देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने