मंदौस, तौते, यास; चक्रीवादळांना अशी अतरंगी नावं कुठून मिळाली?

दिल्ली : भारताने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादळं पाहिली आहेत. अम्फान, यास, असानी, तौते, गुलाब निसर्ग अशा चक्रीवादळांचा अनुभव आपण घेतला. आता मंदौस या नव्या चक्रीवादळाचा फटका आपल्याला बसणार आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या, या वादळांना नावं कशी दिली जातात.वर्ष 2004 मध्ये जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ)च्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं. यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.



चक्रीवादळ कसे तयार होते?

वातावरणातील विविध बदलांमुळे मान्सून पॅटर्नबरोबरच चक्रिवादळांचा पॅटर्नदेखील बदलला आहे. एखाद्या ठिकाणी तापमान जास्त झाले व इतर भागांत ढगाळ वातावरणामुळे वा अन्य कारणांमुळे तापमान कमी झाले, तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जोरात वाहू लागते. तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली, तर वादळाचा जन्म होतो. खरे तर चक्रिवादळे तयार होण्याची प्रक्रिया ही अतिशय संथ गतीने म्हणजे 240 ते 250 तासांची असते.

एखाद्या व्यक्तीला चिडवत आपण जसे त्याला काही तरी वेगळेच नाव देतो, तसे ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी एकमेकांना माहितीचे आदान-प्रदान करत संवाद साधताना सर्वप्रथम वादळांना गंमत म्हणून नावे द्यायला नव्हे, तर नावे ठेवायला सुरुवात केली. कधी आपल्या नावडत्या राजकीय नेत्यांच्या नावाने, तर कधी आपल्या बायकोच्या किंवा गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडच्या नावाने मग वादळे ओळखली जाऊ लागलीत.1979 मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री-पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला. जागतिक हवामान संस्थेने 2000 पासून एक नियमावली बनवत, काही मापदंड (स्टँंडर्ड) तयार केले व निसर्गाशी संबंधित किंवा एखाद्या खाद्य पदार्थाची नावे चक्रिवादळांना मिळू लागली. आलटून पालटून स्त्रीलिंगी व पुल्लिंगी नावांचा वापरही सुरू झाला. 'निसर्ग' हे नाव चक्रिवादळाला बांगलादेशाने घोषित केले होते. पुढील काही चक्रिवादळांची नावे गती (भारतद्वारे नामित), निवार (इराण), बुरेवी (मालदीव), तौक्ते (म्यानमार) आणि यास (ओमान) अशी असतील.

जगातल्या चक्रिवादळांच्या नामकरणाची जबाबदारी ही रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर्स आणि ट्रॉपिकल सायक्लोन वार्मिंग सेंटर्स यांची आहे. भारताच्या हवामान खात्यासह एकूण सहा आरएसएमसी आणि पाच टीसीडब्ल्यूसी आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर भारतीय समुद्रावर विकसित होणाऱ्या चक्रिवादळांची नावे ठेवण्याची जबाबदारी भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) देण्यात आली आहे.बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे या पॅनलचा भाग होते. नंतर 2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन यांना या यादीत समाविष्ट केले गेले. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, वादळांचे नामकरण करताना नावे लिंग, राजकारण, धर्म आणि संस्कृती याबाबत पक्षपाती नसावे तसेच कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही व काही आक्षेपार्ह नसावे.तसेच ते छोटे व उच्चार करण्यास सोपे आणि सुलभ असावे असा नियम आहे. वादळांचा इशारा प्रभावीपणे लोकांना देण्यासाठी तसेच सायंटिफिक कम्युनिटीला आणि आपत्ती व्यवस्थापकांना मदत करण्यासाठी ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय चक्रिवादळांना नावे देण्यात येते. एकाच वेळी अनेक वादळे निर्माण झाल्यास त्यांना ओळखण्यासदेखील यामुळे मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने