पोलिस भरतीत गोळाफेकीच्या ३ संधी! वेळ अन्‌ गुण जाणून घ्या, ‘मैदानी‘त यशस्वी व्हा

सोलापूर : पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.







गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत. तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे. यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे, पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.

लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.

अशी असेल गुणदान पद्धत

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

१०० मीटर धावणे (महिला) :

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

------------------------------------------------

८०० मीटर धावणे (महिला) :

२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.

-------------------------------------------

१६०० मीटर धावणे (पुरुष) :

५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने