एक ग्लास पाण्यातून घराला वर्षभर वीज!; अणुकेंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रयोगाला मोठे यश

दिल्ली:  अणुकेंद्रकांच्या संयोगातून (न्यूक्लिअर फ्यूजन) ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरिकेतील संशोधकांना मोठे यश आले आहे. या प्रक्रियेसाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यामुळे कार्बनमुक्त आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे. यावर अधिक संशोधन होऊन खरोखर निर्मितीप्रकल्प अस्तित्वात आले, तर केवळ एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल.कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोअर राष्ट्रीय प्रयोगशाळेत अणुकेंद्रक संयोगाच्या प्रयोगाला मोठे यश लाभल्याची घोषणा अमेरिकेच्या ऊर्जासचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी मंगळवारी जाहीर केले. 

येथे प्रयोगशाळेतील तज्ज्ञांसह पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत घोषणा केली. प्रयोगाच्या यशामुळे येत्या काळात संरक्षणक्षेत्र तसेच स्वच्छ ऊर्जानिर्मितीमध्ये मोठी क्रांती दृष्टीपथात असल्याचे ग्रॅनहोम म्हणाल्या.अणुऊर्जा निर्माण होताना अणुकेंद्रकांचे विघटन (फीजन) केले जाते. त्याप्रमाणेच दोन अणुकेंद्रकांचे मिश्रण केले तरीही मोठी ऊर्जानिर्मिती होते. सूर्यासारख्या ताऱ्यांमधील ऊर्जा याच अणुकेंद्रक संयोगाचा परिणाम आहे. त्यामुळे एका अर्थी ही प्रयोगशाळेमध्ये ‘सूर्य’ तयार करण्याची प्रक्रिया असून त्यावर जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या दशकभरापासून प्रयोग सुरू आहेत. मात्र आजवर या प्रक्रियेला लागणारी ऊर्जा ही मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा अधिक होती. त्यामुळे प्रत्यक्ष ऊर्जानिर्मितीसाठी तिचा उपयोग नव्हता.अणुकेंद्रक संयोग प्रक्रियेमध्ये डय़ुटेरिअम आणि ट्रीटियम या हायड्रोजनच्या समस्थानिकांमध्ये (आयसोटोप्स) संयोग घडविण्यात आला आहे. एक ग्लास पाण्यातून निघालेल्या डय़ुटेरिअमपासून एका घराला वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा मिळू शकेल, अशी माहिती या क्षेत्रातील संशोधकांनी दिली आहे. ट्रीटियम हे समस्थानिक दुर्मीळ असले तरी ते कृत्रिमरीत्या तयार केले जाऊ शकते.



संशोधनात भारत कुठे?
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमध्ये या प्रक्रियेवर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. फ्रान्समधील ‘इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सप्रिमेंटल रिअॅक्टर’ प्रयोगशाळा हे युरोपातील संशोधनाचे मुख्य केंद्र आहे. या प्रयोगामध्ये भारतासह चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ, रशिया, जपान, दक्षिण कोरिया अशा ३५ देश या प्रयोगामध्ये सहभागी आहेत.

अणुऊर्जेपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित
अणुऊर्जा हा सर्वात कमी प्रदूषण करणारा स्रोत असला, तरी त्यातून तयार होणारा कचरा हा घातक असतो. तो अत्यंत जाड सिमेंटच्या आवरणाखाली वर्षांनुवर्षे पुरून ठेवावा लागतो. अणुकेंद्रक संयोग प्रक्रियेत मात्र असा कोणताही घातक पदार्थ तयार होत नाही. शिवाय चेर्नोबिल, फुकुशिमासारख्या अणुभट्टय़ांच्या अपघातांची शक्यताही नसल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

वीजनिर्मिती कशी?
अणुकेंद्रक संयोगामधून निर्माण झालेल्या ऊर्जेपासून पाणी उकळवून निर्माण झालेल्या वाफेवर विद्युत झोतयंत्र (टर्बाईन्स) चालविली जातील आणि त्यातून वीजनिर्मिती होईल. अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये हीच पद्धत वापरली जाते. मात्र मोठय़ा प्रमाणावर ही प्रक्रिया घडवून त्यातून शहरांना पुरेल एवढी वीजनिर्मिती करणे प्रचंड खर्चिक आहे. पारंपारिक इंधन आणि अणुऊर्जेला समर्थ पर्याय द्यायचा असेल अशी लाखो वीजनिर्मिती केंद्रे जगभरात उभी करण्याचेही आव्हान असेल. अणुकेंद्रक संयोगाच्या प्रक्रियेवर होणारा खर्च घटविण्यावरही संशोधन सुरू असल्याची माहिती संशोधनाशी संबंधितांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने