बाबा रामदेव यांच्या 'पतंजली'ला दणका; 'या' देशाने कंपनीला टाकलं काळ्या यादीत

नवी दिल्ली : पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीला धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निकषांची पूर्तता न केल्यामुळे पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नेपाळने काळ्या यादीत टाकले आहे. केवळ दिव्या फार्मसीविरोधातच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरोधातही हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. नेपाळच्या ड्रग रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या या निर्णयानंतर नेपाळमध्ये पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठं संकट उभं राहिलं आहे. दिव्या फार्मसीसोबतच नेपाळमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या 16 भारतीय औषध कंपन्यांसमोरही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पतंजलीसह सर्व १६ भारतीय औषध कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) औषध निर्मिती मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्या.



नेपाळमध्ये या औषधांचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक एजंटला कडक सूचना देत औषध प्रशासन विभागाने 18 डिसेंबर रोजी नोटीस बजावली आहे. त्यांना या कंपन्यांची सर्व उत्पादने तातडीने मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. विभागाने जारी केलेल्या नोटिसीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी तयार केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत.विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओच्या मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची यादी नेपाळमध्ये जाहीर करण्यात आली आहे. ज्या कंपन्या डब्ल्युएचओच्या मानकांचे पालन करते, त्यांनाच नेपाळमध्ये औषधे विकण्याची परवानगी आहे.

काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये दिव्या फार्मसीशिवाय रेडिएंट पॅरेंटर्स लिमिटेड, मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, अलायन्स बायोटेक, कॅप्टॅब बायोटेक, अॅग्लोमेड लिमिटेड, जी लॅबोरेटरीज, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा, युनिझुल्स लाइफ सायन्सेस, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद लाइफ सायन्सेस, आयपीसीए लॅबोरेटरीज, कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स आणि मॅक्चर लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने