मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी : खासदार राऊत

नाशिक : स्वाभिमानाच्या मुद्यावर शिवसेना सोडल्याचे मुख्यमंत्री सांगतात. मात्र सध्या पदोपदी महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जात आहे. शेजारच्या राज्यांच्या कागाळ्या वाढल्या आहेत. सीमावर्ती भागातील गावात शेजारील राज्यात समावेशाची भाषा सुरू झाली आहे. कर्नाटकने महाराष्ट्रात पाणी सोडले. पदोपदो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे. आता कुठे गेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान? असा प्रश्न करत कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.श्री. राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता. २) सकाळपासूनच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी नांदगावला शिवसेनेच्या मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते.



राऊत म्हणाले, की फुटीच्या भीतीने डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा बिलकूल नाही, शिवसेना आहे तेथेच आहे. मुंबई, कल्याणशिवाय ठाणे महापालिकेतही शिवसेनेला सत्ता मिळेल, अशी परिस्थिती आहे. राज्यभर सगळीकडे हेच वातावरण आहे. त्यामुळेच भीतीतूनच महापालिकेच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना निवडणूक आणि लोकांचीही भीती वाटत आहे. जे आमदार-खासदार शिवसेनेतून गेले, त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच, असे आव्हान देत राऊत म्हणाले, की, राज्यभर सगळ्यांवर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील ‘मेरा बाप चोर’ हे या हातावर लिहिलेल्या वाक्याप्रमाणे राज्यभर गद्दारांवर शिक्का बसला आहे. त्यामुळे लोक खोके वाल्यांना ‘खोके’ म्हणत आहेत. त्यांना सुरक्षेच्या गराड्यात फिरावे लागत आहे. याउलट आम्ही विनासुरक्षा बिनधास्त फिरत आहोत, असे म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे राजकीय करिअर संपले, अशा शब्दात टीका केली.

आघाडीचा प्रयोग कायम

देशातील हुकूमशाही संपविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यापुढे कायम राहील, असे स्पष्ट करीत, ते म्हणाले, की राज्यात यापूर्वी असे प्रयोग झाले आहेत. राज्यात ४० आमदारांचे मुख्यमंत्री असल्याने तीन महिन्यांपूर्वी केलेल्या बंडखोरीव्यतिरिक्त त्यांना काही सांगता येत नाही. शेजारील राज्यांकडून उपद्रव सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यावरून गुजरात निवडणुकीत विषय गाजत आहे. पंतप्रधानावर टीका वाईटच आहे. मात्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली, तरी यांना वाईट कसे वाटत नाही. या सगळ्या अवमानाचा बदला घेतला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने