आफ्रिका खंडातील मोरोक्को रचणार का इतिहास? बलाढ्य फ्रान्सशी सामना

कतार : गतविजेता फ्रान्सचा संघ उद्या फिफा विश्‍वकरंडकातील उपांत्य फेरीच्या लढतीत आफ्रिका खंडातील मोरोक्कोशी लढणार आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विश्‍वविजेतेपदाच्या थाटात खेळणाऱ्या फ्रान्सकडे या लढतीत विजेता म्हणून बघितले जात असले, तरी मोरोक्कोविरुद्ध संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त एक गोल करण्यात आला आहे. बेल्जियम, पोर्तुगाल व स्पेन या युरोपमधील बलाढ्य संघांना मोरोक्कोचा बचाव भेदता आलेला नाही. त्याचमुळे फ्रान्सचे आक्रमण आणि मोरोक्कोचा बचाव अशीच ही लढत असणार आहे.



फ्रान्सने साखळी फेरीच्या लढतीत दोन विजय मिळवत बाद फेरी गाठली. ट्युनिशियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत त्यांचा पराभव झाला, पण या पराभवाने त्यांच्या बाद फेरीतील स्थानाला धक्का बसला नाही. त्यानंतर पोलंड व इंग्लंडवर मात करीत फ्रान्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. किलीयन एम्बाप्पे, ए. ग्रिझमन, ऑरेलियॉ चुआमेनी, ओलिव्हिए जिरू यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर फ्रान्सने इथपर्यंत मजल मारली आहे. एम्बाप्पेने सर्वाधिक पाच गोल केले आहेत. तसेच २१ वेळा गोलसाठी प्रयत्नही त्याच्याकडून करण्यात आले आहेत. चुआमेनी याने सर्वाधिक ३५५ पासेस दिले आहेत. शिवाय तो ५१.६९ किलोमीटर धावला आहे. ग्रिझमन याने ३४ क्रॉस केले असून तीन गोलना साह्य केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोलरक्षक हुगो लोरीस याने ४० गोल रोखले आहेत.

वलीद रेगरेगी यांच्या मार्गदर्शनात मोरोक्कोच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मोरोक्कोचा संघ बचाव फळीत नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. अश्रफ हकीमी याने बचाव फळीत ठसा उमटवला आहे. त्याने सर्वाधिक २२८ पास दिले असून मधली फळी व बचाव फळी यामध्येही त्याने सुंदर खेळ केला आहे. हकीम झियेच याने मधल्या फळीत प्रतिस्पर्ध्यांची कोंडी केली आहे. त्याने २० क्रॉस केले असून आठ वेळा गोलचा प्रयत्नही केला आहे. गोलरक्षक म्हणून यासिन बोनो याने ३९ गोल होण्यापासून रोखले आहेत.

ब्राझीलची पुनरावृत्ती?

फ्रान्सकडे ब्राझीलची पुनरावृत्ती करण्याची संधी असणार आहे. ब्राझीलने १९९४, १९९८ व २००२ या तीन सलग विश्‍वकरंडकात अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर कोणत्याही देशाला सलग दोन स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आलेला नाही. फ्रान्सने २०१८ मध्ये विश्‍वकरंडक जिंकला असून आता त्यांना सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची आहे. असे झाल्यास सलग दोन स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा फ्रान्स हा ब्राझीलनंतरचा संघ ठरणार आहे. तसेच इटली, जर्मनी, नेदरलँडस्‌ व अर्जेंटिना या देशांनीही सलग दोन विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण ब्राझील व इटली वगळता एकाही देशाला अजिंक्यपद राखता आलेले नाही.

इतिहास रचण्यास तयार

मोरोक्को हा आफ्रिका खंडातील देश. या खंडातील देशांना अद्याप विश्‍वकरंडकाची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. मोरोक्कोने उपांत्य फेरीत प्रवेश करून यंदा नवा इतिहास लिहिला आहे. आता त्यांना एक पाऊल आणखी पुढे टाकायचे आहे. मोरोक्कोने गतविजेत्या फ्रान्सला हरवल्यास विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारा आफ्रिका खंडातील पहिला देश म्हणून त्यांना गौरवण्यात येईल. हा त्यांच्यासाठी मोठा सन्मानच असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने