“आम्ही देशासाठी बलिदान दिलं, तुमचा कुत्रा तरी मेला का?”, मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर हल्लाबोल

दिल्ली: आम्ही ( काँग्रेसने ) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात सुरु आहे. तेव्हा एका सभेला मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये सीमारेषेवर भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यातील झटापटीवरूनही खरगेंनी भाजपावर टीका केली आहे.




“मोदी सरकार सांगते की ते खूप मजबूत आहेत. त्यांच्याकडे कोणीही डोळे मोठे करून पाहू शकत नाही. पण, सीमेवर वाद आणि चकमकी वाढल्या आहे. गलवान सीमेवर २० सैनिक शहीद झाल्यानंतर पंतप्रधान मोदी क्षी जिनपींग यांना १८ वेळा भेटले. त्यांच्यावर झोपाळ्यावर झोकेही घेतले. तरीही, चीनच्या सीमेवर हल्ले का होत आहेत,” असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केला.

“पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण…”

“भारत-चीन सीमेवरील चिनी घुसखोरी सरकार रोखू शकत नाही. संसदेत चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे काम करतात. आम्ही देशाबरोबर आहोत. मात्र, सरकार माहिती लपवत आहे,” असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केंद्र सरकारवर केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने