नक्की चाललय काय? Amazon, Twitter नंतर आणखी एका टेक कंपनीने दिला ४ हजार जणांना नारळ

मुंबई: गेल्या काही दिवसात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या टेक कंपन्या असलेल्या Meta, Amazon आणि Twitter चा समावेश आहे. या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आता या यादीमध्ये आणखी एका कंपनीचा समावेश झाला असून, आयटी-नेटवर्किंग कंपनी असलेल्या Cisco ने ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.Cisco कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर कंपनीने एकूण ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. यानुसार, जवळपास ४ हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. ठराविक कामात संतुलन निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.



या कपातीवर कंपनीकडून थेट कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु, कंपनीने अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, हा निर्णय सहज घेण्यात आलेला नाही. या निर्णयाचा फटका ज्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे, त्यांना आर्थिक मदत केली जाईल. रिपोर्टनुसार Cisco चे सीईओ आणि चेअरमन Chuck Robbins याबाबत बोलताना म्हणाले की, विशिष्ट कामासाठी कर्मचारी कपात करून संतुलन निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.या कपातीनंतर आता कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधण्यास देखील सुरुवात केली आहे. काही कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून भरपाई मागण्यास देखील सुरुवात केली आहे. परंतु, Cisco कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, ट्विटर, मेटा आणि अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. रिपोर्टनुसार, Google देखील लवकरच कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्या कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी करत आहोत व अनावश्यक कपात टाळण्याचा देखील प्रयत्न असेल. ट्विटरने जगभरातील तब्बल ५००० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मेटाने देखील तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातीमुळे ही आर्थिक मंदीची सुरुवात तर नाही ना, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने