जयंत पाटील निलंबित असताना अजित पवारांनीही उच्चारला 'तो'च शब्द; कारवाई होणार?

मुंबई :  राज्याच्या हिवाळी अधिवेशनात असंसदीय शब्द उच्चारल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील निलंबित झाले आहेत. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही तोच शब्द उच्चारला आहेत. त्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवार टीका करत होते. राज्याच्या इतर मंत्र्यांचे कार्यक्रम आणि त्यावर होणारा खर्च याबद्दलही अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, "सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाचा कार्यक्रम करायचा म्हणून १५-३० कोटी गोळा करण्याचं काम सुरू आहे. पत्रिका खपवण्यासाठी पैसे वाटणं सुरू आहे."



अजित पवार पुढे म्हणाले, "चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, फू बाई फू, असे अनेक कार्यक्रम असतात, ते घ्यायला करोडो रुपये लागतात. असल्या कार्यक्रमातून वसुली सुरू आहे. या महोत्सवासाठी कृषी खात्याला वेठीस धरलं आहे. ही बाब गंभीर आहे."अजित पवारांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. पवार म्हणाले, "हा भ्रष्टाचार चाललेला नाही का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून काय काय सुरू आहे. सतत शिवीगाळ सुरू आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात, दारू पिता का म्हणून. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. "याच 'निर्लज्ज' शब्दामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं होतं. आता अजित पवारांनीही हाच शब्द वापरला आहे. त्यावर आता कोणती कारवाई होते हे पुढच्या काळात पाहायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने