गाडगेबाबांच्या भेटीनंतर खुद्द बाबासाहेबांच्या डोळ्यांत उभे राहिले अश्रू

 मुंबई : महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला संतांची थोर परंपरा लाभली आहे. प्रत्येक संताचं कार्य वेगळं आणि महत्त्वाचं आहे. असेच एक संत, ज्यांनी कायम स्वरूपी आपल्या हाती खराटा घेऊन रस्ते, मोटारस्थानक, रेल्वे स्टेशन, गुरांचे गोठे, तुंबलेली गटारे, अधिवेशनाचे आवार, मंदिरांचे पटांगण आणि मोठमोठ्या शहरांतील हमरस्ते झाडले.त्यांनी अखंड पन्नास वर्षे सार्वजनिक स्वच्छतेचे काम केलं. सार्वजनिक स्वच्छतेची चळवळ निर्माण केली होती. एकट्या माणसाने सुरू केलेलं हे स्वच्छतेचं आंदोलन होतं. या सार्वजनिक स्वच्छतेचे अध्वर्यू होते संत गाडगेबाबा.त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. गाडगे महाराज यांचं बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेलं. 



गाडगेबाबा यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केलं.गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिलं. त्यांच्या या कार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा प्रभावित झाले होते. गाडगे महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एक हदयस्‍पर्षी आठवण सांगितली जाते.14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहकाऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचं होतं. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. "डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या समाजापुढे श्रमांचा आदर्श ठेवला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने