“….पण ‘ती’ गोष्ट राहून गेली”; ‘बिग बॉस’ विजेता अक्षयने अमृता देशमुखबद्दल केलं भाष्य

मुंबई:  ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अखेर रविवारी (८ जानेवारी) पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतपदाचा मान पटकावला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकतंच अक्षय केळकरने एका मुलाखतीत अमृता देशमुखबद्दल भाष्य केलं आहे.



अक्षय केळकर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर आता अनेक चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आला की,” बिग बॉसच्या घरात असा कोणता क्षण आहे का जिथे तुला असं वाटत तो क्षण तू चांगल्या प्रकारे हाताळला असतास? त्यावर अक्षय म्हणाला, “नाही अजिबात नाही, मी त्या त्या त्यावेळी सुधारलो आहे, असा कोणता क्षण सांगता येणार नाही. कदाचित एक गोष्ट होऊ शकली असती की अमृता देशमुखाबरोबरचा बॉन्ड आणखीन चांगला झाला असता. आमच्यात मतभेद मध्ये झाले होते ते सुधारता आले असते पण त्याला उशीर झाला होता, यात चुकी दोघांची नाही कारण परिस्थिती तशी होती.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने